पुणे - कामावरून काढल्याच्या कारणावरून अधिकाऱ्यास मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2018 08:24 PM2018-07-22T20:24:08+5:302018-07-22T20:24:14+5:30
दगडाने कंपनीची तोडफोड, चौघांवर गुन्हा दाखल
चाकण : खराबवाडी ( ता.खेड ) येथील एका कंपनीने कामावरून काढल्याच्या कारणावरून कंपनीच्या अधिकाऱ्यास मारहाण, शिवीगाळ व दमदाटी करून दगडांनी कंपनीच्या काचा फोडून नुकसान केल्या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे अंमलदार सुभाष पवार यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि घटना शुक्रवारी ( दि. २० ) रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास खराबवाडी येथील सातव इस्टेट मधील युनवु ऑटोमोटिव्ह इंडिया प्रा. लि. या कांपनीच्या आवारात घडली. कंपनीचे अधिकारी रामदास चंद्रकांत कारले ( वय ३२, रा. चांडोली, ता.खेड ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रशांत लांडगे व शंकर कोतेकर ( दोघेही रा.खराबवाडी, चाकण ) आणि इतर दोन इसम ( नाव, पत्ते माहित नाहीत ) या चार जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६६१/२०१८, भादंवि कलम ४४७, ४५२, ४२७, ३२३, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी यांनी दारू पिऊन कंपनीच्या आवारात अनधिकृतपणे प्रवेश करून प्रशांत लांडगे याला कंपनीने कामावरून काढल्याचा राग मनात धरून कारले यांना शिवीगाळ व दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच हातातातील दगडांनी रिसेप्शन मधील टेलिफोन, कंपनीच्या खिडकी, टॉयलेट, व दरवाज्याच्या काचा, टीपॉय, व फिर्यादीची दुचाकी क्रमांक ( एम एच १४ डी व्ही ४७९७ ) चे नुकसान केले. पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आर. टी. मोरे हे पुढील तपास करीत आहेत.