पुणे - नगर महामार्गावर टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 20:32 IST2021-06-27T20:31:49+5:302021-06-27T20:32:07+5:30
वाघोली येथील घटना, टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे

पुणे - नगर महामार्गावर टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
वाघोली: टेम्पोची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघात झाल्याची घटना पुणे-नगर महामार्गावर वाघोली येथील सुश्रुषा हॉस्पिटलसमोर घडली. त्यामध्ये दुचाकी चालवत असणाऱ्या वृद्धाचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला आहे. याप्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. अरुण कृष्णा देशमुख (वय ६७, रा. केसनंद रोड, वाघोली) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वृद्धाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली येथील अरुण देशमुख हे पुणे - नगर महामार्गावर असणाऱ्या एसबीआय बँकेतील काम संपवून एचडीएफसी बँकेत दुचाकीवरून जात होते. सुश्रुषा हॉस्पिटलसमोर पुण्याहून नगरच्या दिशेने जाणाऱ्या आयशर टेम्पो व दुचाकीची धडक झाली. यामध्ये दुचाकीवरील वृद्ध गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी राहुल देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार टेम्पोचालक संदीपसिंग शेरसिंग (रा.जम्मू कश्मीर) यास पोलिसांनी अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास लोणीकंद चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस करीत आहेत.