पुणे धोक्याच्या सीमेवर; आपण शहाणे होणार आहाेत की चुकाच करत राहणार? - वंदना चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 12:57 PM2022-10-20T12:57:08+5:302022-10-20T12:57:17+5:30
पाऊस तर नियमाने पडतच राहणार, आपण सुधारलो नाही तर येत्या दोन-चार वर्षांतच पाण्याचा फुगवटा शहरात यापेक्षा भयंकर हाहाकार उडवू शकतो
पुणे : दिल्लीतील टेरी संस्थेने चार वर्षांपूर्वी पुण्याविषयी अहवाल दिला होता की, शहरातील हिरवे आच्छादन वाढवले नाही तर शहर धोक्याच्या सीमेवर येईल. महापालिकेनेच हा अहवाल तयार करून घेतला आणि तो आल्यानंतर चार वर्षे बासनात बांधून ठेवला. सोमवारी पावसाने शहराची जी दैना उडवली त्याला हाच निष्क्रीयपणा कारणीभूत आहे, अशी टीका खासदार वंदना चव्हाण यांनी केली.
आपण जे करायला नको ते करत आहोत आणि त्याचा दोष टक्केवारी वाढली म्हणून पावसावर ढकलत आहोत. पाऊस तर नियमाने पडतच राहणार, आपण सुधारलो नाही तर येत्या दोन-चार वर्षांतच पाण्याचा फुगवटा शहरात यापेक्षा भयंकर हाहाकार उडवू शकतो, अशी भीतीही खासदार चव्हाण यांनी व्यक्त केली. नगरसेवक, माजी महापौर व आता खासदार असलेल्या चव्हाण यांनी सातत्याने शहरातील पर्यावरणासंदर्भात ठाम भूमिका घेत महापालिकेला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.
सोमवारी झालेल्या पावसात शहराचे, नागरिकांचे, व्यावसायिकांचे जे काही हाल झाले त्याला आपणच जबाबदार आहोत, असे स्पष्टपणे सांगून चव्हाण म्हणाल्या की, लोकप्रतिनिधी म्हणून, एका राजकीय पक्षाची शहराध्यक्ष म्हणून मी नेहमीच पर्यावरणाला हानी पोहोचेल अशा कामांना विरोध केला. मात्र, त्याकडे कधीही लक्ष दिले गेले नाही. उलट सातत्याने चुकाच होत चालल्या आहेत. टेकड्यांवर बांधकामांना परवानगी, नदीचे पात्रच कमी करणारा मेट्रो मार्ग, रिव्हर फ्रंड प्रकल्प हे सगळे चुकीचेच आहे आणि ते आपण करतो आहोत.
नदीपात्राचा नैसर्गिक आकार कमी झाल्यानंतर पाण्याचा फुगवटा होईल, हे कोणीही सांगेल. मग नदीकाठी वसाहती असतील तर त्यात पाणी शिरेल नाहीतर दुसरे काय होईल? टेकड्यांवर बांधकामे केली तर पावसाचे प्रमाण कमी होईल की वाढेल? या सर्व गोष्टींचा जगभरात शास्त्रीय अभ्यास होऊन त्यातून निष्कर्ष काढले गेले आहेत. त्यामध्ये नदीचा आकार नैसर्गिक राहू द्यावा, टेकड्या फोडू नयेत, त्यावर बांधकाम करू नये, त्यावरची वृक्षराजी कायम ठेवावी, त्यात वाढ व्हावी हे ते उपाय आहेत.
पाऊस कधीही अचानक पडत नाही. तो किती येणार हे आधी कळत नाही म्हणून तर त्यापासून वाचण्यासाठीचे सर्व उपाय आधीच करायचे असतात. ते आपण करत नाहीच, उलट आपण त्यात अडथळे निर्माण करतो आहोत.
पुणे धाेक्याच्या सीमेवर
टेरी या संस्थेच्या अहवालानुसार पुणे धोक्याच्या सीमेवर आहे. या अहवालानंतर लगेचच महापालिकेने एक कृती कार्यक्रम तयार करायला हवा होता. त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा होता. त्यात सांगितले तशा कामांना सुरूवात करायला हवी होती. तसे काहीही झालेले नाही. आम्ही सर्वच पर्यावरणप्रेमी लोक आता महापालिकेला सांगून-सांगून कंटाळलो आहोत. यासाठी आता नागरिकांनीच पुढाकार घेत महापालिकेवर दबाव आणायला हवा, असे माझे मत आहे, असेही खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या.