उद्धवसेनेकडून पुणे वेटिंगवर; पहिल्या यादीत उमेदवारीच नाही, कोथरूडला मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 13:53 IST2024-10-24T13:52:29+5:302024-10-24T13:53:29+5:30
प्रतिस्पर्धी पक्षाची नावे जाहीर झाल्यानंतरच पुण्यातील नावे जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते

उद्धवसेनेकडून पुणे वेटिंगवर; पहिल्या यादीत उमेदवारीच नाही, कोथरूडला मिळणार?
पुणे : उद्धवसेनेची पहिली यादी मुंबईतून जाहीर झाली. त्यात ६५ उमेदवारांची नावे आहेत; मात्र पुणे जिल्ह्यातील एकही नाव त्यात नाही. दुसऱ्या यादीत जिल्ह्यातील नावे असतील, असे पक्षाकडून सांगण्यात आले. प्रतिस्पर्धी पक्षाची नावे जाहीर झाल्यानंतरच पुण्यातील नावे जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते.
पक्षाचे संपर्कप्रमुख सचिन अहीर यांनी जिल्हा व शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक अलीकडेच घेतली होती. त्यात पुणे शहराकडून कोथरूड, हडपसर व वडगाव शेरी या ३ मतदारसंघांची मागणी महाविकास आघाडीकडे करावी, असे सांगण्यात आले होते. जिल्ह्यातून भोसरी, खेड-आळंदी व जुन्नर हे विधानसभा मतदारसंघ मागण्यात आले होते. यातील एकाही मतदारसंघाचे नाव पक्षाकडून प्रसिद्ध केलेल्या पहिल्या यादीत नाही. जिल्ह्यातील उद्धवसेनेच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांमध्ये त्याची चर्चा होती.
प्रतिस्पर्धी पक्ष कोणाला उमेदवारी देईल, ते पाहून नंतर उमेदवार ठरवण्यात येणार असल्याचे काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यातही कोथरूड मतदारसंघ जागावाटपात उद्धवसेनेकडे नक्की असल्याचे या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गुरुवारी यादी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.