पुणे : सत्ताधा-यांचे एक वर्ष; ठोस कामात अपयश, विरोधकांची भाजपावर टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 05:39 AM2018-02-26T05:39:37+5:302018-02-26T05:39:37+5:30
भारतीय जनता पार्टीच्या महापालिकेतील सत्तेला वर्ष पुरे होत असताना, विरोधातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडून फसव्या आश्वासनांची वर्षपूर्ती, अशी टीका करण्यात येत आहे.
पुणे : भारतीय जनता पार्टीच्या महापालिकेतील सत्तेला वर्ष पुरे होत असताना, विरोधातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडून फसव्या आश्वासनांची वर्षपूर्ती, अशी टीका करण्यात येत आहे. ठोस कामे करण्यात अपयशी असे काँग्रेसने म्हटले आहे, तर पोकळ आश्वासनांचे एक वर्ष, अशी संभावना राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी मात्र निवडणुकीतील आश्वासनांप्रमाणे पक्षाचे महापालिकेतील काम सुरू असल्याचा दावा केला आहे.
काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी निराशाजनक वर्षे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. पुणेकरांनी भरभरून मते दिली; मात्र त्याचा उपयोग ते करू शकले नाहीत, असे दिसते आहे. आठही आमदार मौनी, खासदार मौनी व महापालिकेतील पदाधिकारी फक्त बोलघेवडे, असे बागवे म्हणाले. काँग्रेसने केलेल्या विरोधामुळेच २४ तास पाणी योजनेतील १ हजार कोटी रुपये वाचले. घनकचरा व्यवस्थापनाची समस्या अजूनही कायम आहे. जुन्या वाड्यांच्या पुनर्वसनाबाबत काहीही निर्णय घेतला जात नाही, अशी महापालिकेची सद्य:स्थिती आहे. भाजपानेच आपण गेल्या वर्षभरात काय केले ते पुणेकरांसाठी जाहीर करावे, अशी मागणी काँग्रेसने केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष, खासदार वंदना चव्हाण यांनीही भाजपाला टीकेचे लक्ष्य केले आहे. पीएमपीची बसखरेदी वादात, २४ तास पाणी योजना अद्याप कागदावरच, स्मार्ट सिटी भोवतीही वादच, कचºयाची समस्या आहे तशीच असे चव्हाण म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी अनेक गैरव्यवहार उघडकीस आणल्यामुळे पाणी योजना, कात्रज-कोंढवा रस्ता अशा अनेक योजनांच्या निविदा रद्द कराव्या लागल्या. केवळ फसवी आश्वासने देण्याशिवाय भाजपाने काहीही केले नाही, असे त्यांनी सांगितले.
अनेक कामे प्रत्यक्षात : योगेश गोगावले
भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी मात्र महापालिकेतील काम व्यवस्थित सुरू असल्याचे स्पष्ट केले. पक्षाने निवडणुकीत प्रभागनिहाय; तसेच शहराचा म्हणून असे दोन जाहीरनामे प्रसिद्ध केले होते, त्यातील अनेक कामे प्रत्यक्षात येत आहेत. मेट्रोचे काम सुरू झाले, पाणी योजनेच्या निविदा मंजूर झाल्या, नागरिकांनी सुचवलेली कामेही शहराच्या सर्व भागात व्यवस्थित सुरू आहेत, असे गोगावले म्हणाले.