नदीत कोसळता कोसळता वाचला अन् अनर्थ टळला; भरधाव ट्रक कठड्यावरुन फुटपाथवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 03:21 PM2023-05-28T15:21:45+5:302023-05-28T15:23:38+5:30

प्रसंगावधान ट्रकच्या ड्रायव्हरने ब्रेक मारल्याने अनर्थ टळला, अन्यथा ट्रक नदीत कोसळला असता

Pune Pandharpur Palkhi Road Accident; Rushing truck off the cliff onto the pavement, luckily... | नदीत कोसळता कोसळता वाचला अन् अनर्थ टळला; भरधाव ट्रक कठड्यावरुन फुटपाथवर

नदीत कोसळता कोसळता वाचला अन् अनर्थ टळला; भरधाव ट्रक कठड्यावरुन फुटपाथवर

googlenewsNext

नीरा : पुणे आणि सातारा जिल्ह्याची सिमा असलेल्या नीरा नदीच्या पुलाचा कठड्यात अडकून अपघात झाला आहे. भरधाव ट्रक कठड्यावरुन फुटपाथवर आला. पण सुदैवाने नदीत कोसळला नाही.  या अपघाताने वारी काळातील अकरा वर्षांपूर्वीच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. यामुळे पुणे पंढरपूर पालखी मार्गावरील वाहन चालकांचा व वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पुणे पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा नदीच्या पुलावर ट्रकला अपघात झाला. रविवारी (दि.२८) दुपारी साडेबाराच्या सुमारास लोणंद (जिल्हा सातारा) बाजूकडून मालवाहतूक करणारा ट्रक नीरा शहराकडे चालला होता. अचानक महिला दुचाकीस्वाराने कट मारल्याने ट्रकचालकाने स्टेअरींग डाव्या बाजुला ओढले. या दरम्यान ट्रकचे पुढील बाजूचे डावेचाक रस्त्याचे कमी उंचीचे कठड्यावरुन फुटपाथवर गेले. ट्रकची डावी बाजू पुलाच्या मोठ्या कठड्याला टेकणार तोच ड्रायव्हरने ब्रेक मारल्याने अनर्थ टळला. अन्यथा ट्रक नदीत कोसळला असता. 

नीरा, पाडेगाव, निंबूत, वाघळवाडी, मळशी येथील युवकांनी ट्रकचालकाला आधार देत, शर्तीचे प्रयत्न करत कठड्यावरुन ट्रक पुन्हा रसत्यावर आणला. यादरम्यान सुमारे दिडतास वाहतूक कोंडी झाली होती. पालखी मार्गावर नीरा बस स्थानका पर्यंत तर पाडेगाव ऊस संशोधन केंद्रा पर्यंत व नगर मार्गावर बुवासाहेब चौका पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. स्थानिक युवकांनीच या वाहतूक कोंडीतून वाहनचालकांना वाट काढून देण्याचे प्रयत्न केले. 

 २० जून २०१२ रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा वाल्हे मुक्कमी असताना. पहाटेच्या वेळी वारकरी व त्यांचे साहित्य घेऊन निघालेला ट्रक याच ठिकाणी अशाच पद्धतीने नीरा नदीत कोसळला होता. त्यावेळी नऊ वारकऱ्यांचा मृत्यू तर सात जण जखमी झाले होता. पालखी सोहळ्या आधी प्रशासनाकडून विविध विभागाचे अधिकारी, पालखी सोहळा प्रमुख व मानकरी दौरे करत रस्ता सुरक्षितेची पाहणी करत असतात. मात्र धोकेदायक ठिकाणी काहीच उपाययोजना करताना दिसून येत नाहीत.

Web Title: Pune Pandharpur Palkhi Road Accident; Rushing truck off the cliff onto the pavement, luckily...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.