‘पुणे ते पॅरिस’ एकच मानसिकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:10 AM2021-07-15T04:10:15+5:302021-07-15T04:10:15+5:30
प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने युरोपातल्या अनेक देशांमध्ये हजारो चाहते एकत्र येत होते. कोपा अमेरिका ...
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने युरोपातल्या अनेक देशांमध्ये हजारो चाहते एकत्र येत होते. कोपा अमेरिका फुटबॉलमुळे दक्षिण अमेरिकेत हेच घडत होते. विम्बल्डनमध्ये हेच दृष्य इंग्लंडमध्ये होते. टीव्हीवरून हा सगळा जल्लोष पुण्याने पाहिला. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर या सगळ्यांचे महत्त्व किती आणि कसे? असा संभ्रम पुणेकरांमध्ये निर्माण झाला आहे.
लसीकरणानंतर तर ही बेफिकिरी वाढत चालल्याचे दिसते. त्यामुळेच युरोप-अमेरिकेतल्या बिनामास्कच्या गर्दीची दृष्ये पुण्यातही दिसू लागली आहेत. यातून सर्वांच्या सुरक्षिततेसाठी असणारे नियम धाब्यावर बसवण्याची मानसिकता दिसत आहे. दुसरीकडे या नियमांची गरज काय, असा प्रश्नही विचारला जात आहे. विषाणूजन्य आजारांच्या तज्ज्ञांनी मात्र या बेफिकिरपणाचे परिणाम येत्या महिन्याभरात दिसतील असा इशारा दिला आहे. त्यासाठी एक कोटींपेक्षाही कमी लोकसंख्येच्या इस्रायलचे उदाहरण दिले जात आहे. या देशातील ७० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येचे लसीकरण झाल्यानंतरही येथील कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. परिणामी इस्रायलमध्ये कोरोना लसीचा तिसरा डोस देण्याचा विचार सुरू झाला आहे.
कोरोनाची साथ रोखायची असेल तर लसींचे दोन्ही डोस घेतल्यावरही मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझर या त्रिसूत्रीला पर्याय नसल्याचे आरोग्यतज्ज्ञ सांगत आहेत. मात्र क्रीडा स्पर्धा, राजकीय कार्यक्रम, धार्मिक सोहळे, व्यापारी बाजारपेठा आदी ठिकाणी सर्रास गर्दी होताना दिसत आहे. ही बेशिस्त पुणेकरांना तिसऱ्या लाटेच्या रुपाने भोवणार का, याबद्दल मात्र मतमतांतरे आहेत.
चौकट
लस घेतल्यानंतरही काळजी हवीच
“लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनाची सौम्य स्वरुपाची लागण होऊ शकतो. यातून इतरांना संसर्ग होऊ शकतो. युरोपातही मास्कचा वापर सक्तीचा आहे. अमेरिकेत मास्क न वापरण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. मात्र, दोन दिवसांत हा निर्णय मागे घ्यावा लागला. कारण, सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक माणसाचे लसीकरण झाले की नाही हे तपासणे शक्य होत नाही. इंग्लंडमध्ये १९ जुलैैपासून लॉकडाऊन पूर्णपणे हटवला जाणार आहे. तिथेही भारताएवढीच रुग्णसंख्या दररोज नोंदवली जात आहे. मात्र, मृत्यूदर कमी आहे. युरो कपदरम्यान लसीकरण झालेल्या प्रेक्षकांनाच स्टेडियममध्ये प्रवेश दिला गेला. सोशल डिस्टन्सिंग मात्र पाळले गेले नाही. नियम मोडणाऱ्यांची मानसिकता जगात सर्वत्र सारखीच आहे. कोरोनाची पुन्हा लागण होण्याचे इंग्लंडमधील प्रमाण ४ टक्क्यांहून कमी आहे. सध्याच्या रुग्णसंख्येत लसीकरण न झालेल्यांचे प्रमाण जास्त आहे. येथे टेस्टिंग मोठ्या प्रमाणात झाल्याने केसेस लवकर समोर आल्या. रुग्णसंख्या खालावली तरी मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे नियम सर्वांनी पाळलेच पाहिजेत.”
- डॉ. नानासाहेब थोरात, वरिष्ठ शास्त्रज्ञ, ऑक्सफर्ड विद्यापीठ, लंडन
चौकट
‘कोपा अमेरिका’ खेळलेल्या ब्राझीलमध्ये
“ब्राझील हा भारतसारखाच प्रचंड मोठ्या लोकसंख्येचा आणि वेगवेगळ्या भौगोलिक स्थितीचा देश आहे. ब्राझीलमधील २७ राज्यांपैकी २ राज्यात रुग्णसंख्या वाढते आहे. ६ राज्यांत रुग्णसंख्या स्थिर आहे, तर १९ राज्यांमध्ये ती कमी होतेय. याचबरोबर संपूर्ण देशात मृत्यूदर पण कमी होतोय. येथे ४० टक्क्यांच्या आसपास लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. ब्राझीलमध्ये 'कोपा फुटबॉल' सामने प्रेक्षकांशिवाय खेळवले गेले. तरीही अनेक पब आणि हॉटेलांमध्ये सामने पाहण्यासाठी गर्दी झाली. अनेक जण घरातून बाहेर पडून एकत्रितपणे रस्त्यावर सामने पाहात होते. याचा परिणाम पुढच्या दोन ते तीन आठवड्यांत दिसेल.”
- डॉ. हिल्डा मारिया, शास्त्रज्ञ, मोईन्होसदे वेंटो हॉस्पिटल, पोर्तो-ऑलेग्री, ब्राझील
चौकट
आता तरी व्हावे शहाणे
“युरोपीय देशात क्रीडा स्पर्धांसाठी झालेली गर्दी आणि त्यासाठी दिलेली परवानगी हा मूर्खपणा आहे. याचे परिणाम त्यांना भोगावे लागण्याची दाट शक्यता आहे. आपल्याकडील डेल्टा व्हेरियंट आणि तेथील स्थानिक व्हेरियंटमुळे वाढणाऱ्या संसर्गाचा फटका त्यांना बसणार आहे. भारतातील लोकांनी आता तरी शहाणे व्हायला हवे. दोन्ही डोस घेतले असतील तरी लस न घेतलेल्या व्यक्तीइतकीच काळजी घ्यावी. देशातील किमान ८० टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण होत नाही तोवर हे आवश्यकच आहे. भारतात दोन्ही डोस घेतलेले केवळ ६-८ टक्केच लोक आहेत. त्यामुळे नियम पाळण्यापासून कोणाचीही सुटका नाही.”
- डॉ. सुभाष साळुंखे, सदस्य, कोरोना कृती समिती
चौकट
दोन्ही डोस घेतलेल्यांचे प्रमाण
देश -दिलेले एकूण डोस -दोन्ही डोस लसीकरण -पूर्ण लसीकरणाची टक्केवारी
भारत -३७ कोटी -७.३३ कोटी -५.४
युके -८.०६ कोटी -३.४८ कोटी -५२
ब्राझील -११.४ कोटी -३.०६ कोटी -१४.५