Pune MNS: पावसाने पुणेकरांची दाणादाण; मनसेचे होडी घेऊन महापालिकेसमोर आंदोलन
By निलेश राऊत | Published: June 10, 2024 06:59 PM2024-06-10T18:59:22+5:302024-06-10T19:00:04+5:30
महापालिका प्रशासनाने प्रथम पुणेकरांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन पावसामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर तातडीने कार्यवाही करावी, आयुक्तांना निवेदन
पुणे: शहरात शनिवारी झालेल्या पावसाने पुणेकरांची दाणादाण उडाली. अनेक भागात गुडग्यापर्यंत तर काही भागात कमरे इतके पाणी साचून पुणे शहर पाण्यात गेल्याचा अनुभव सर्वानीच घेतला. पण याचे काहीच देणेघेणे महापालिका प्रशासनाला नसल्याचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवारी महापालिका इमारतीसमोर होडीत बसून, महापालिका प्रशासनाच्या बेजबाबदार कार्यपद्धतीचा मनसेकडून निषेध करण्यात आला.
पुणे शहराच्या रस्त्यावर पूर आल्याने महापालिकेच्या नाले सफाईचे पितळ उघडे पडले आहे. पुणे शहरात झालेल्या पावसामुळे सखल भागात रस्ते चौक जलमय झाले अनेक घरांमध्ये पाणी घुसले,झाडे पडली,वाहतुक कोंडी, सिग्नल यंत्रणा बंद पडली. दरम्यान प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष कागदावरच असल्याचे दिसत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
महापालिकेच्या ढिसाळ नियोजनाने कोंढव्यात मुलीचा बळी घेतलाच परंतु प्रशासन व ठेकेदार यांच्या भ्रष्ट युतीने कोणतीही जबाबदारी घेतली नाही उलट या घटनेवर कारणमीमांसा देण्याचा खोटा दावा प्रशासन करीत आहे. असा आरोप यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी केला. तसेच महापालिका प्रशासनाने प्रथम पुणेकरांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन पावसामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर तातडीने कार्यवाही करावी, महापालिकेचे सर्व प्रमुख अधिकारी, क्षेत्रीय कार्यालये, आपत्ती व्यवस्थापन कक्षातील सर्व अधिकाऱ्याचे नावे फोन नंबर घोषीत करून या पुढे येणाऱ्या पावसाळ्यात पुणेकरांना चांगली नागरी सेवा देऊन सुस्त व्यवस्थेचा नाहक बळी जाणार नाही याची काळजी घ्यावी असे निवेदन यावेळी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र देशमुख यांना देण्यात आले. यावेळी अजय शिंदे, बाबू वागस्कर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.