Helmet Compulsory: पुणेकरांनाे, दुचाकीवरून बाहेर पडताय; दाेघांनीही हेल्मेट घालणे बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 12:02 PM2024-11-28T12:02:09+5:302024-11-28T12:03:33+5:30

पुणे शहरात १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत २७१ अपघात झाले असून यामध्ये २७८ जणांचा मृत्यू झाला

Pune people getting out on bikes Both must wear helmets | Helmet Compulsory: पुणेकरांनाे, दुचाकीवरून बाहेर पडताय; दाेघांनीही हेल्मेट घालणे बंधनकारक

Helmet Compulsory: पुणेकरांनाे, दुचाकीवरून बाहेर पडताय; दाेघांनीही हेल्मेट घालणे बंधनकारक

पुणे : शहरासह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये आता दुचाकीचालकासह सहप्रवाशानेदेखील हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसा निर्णय राज्याच्या वाहतूक विभागाने घेतला आहे. याबाबतचे आदेश राज्याचे अपर पोलिस महासंचालक अरविंद साळवे यांनी दिले आहेत. वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांचा होणारा मृत्यू आणि गंभीर दुखापत याला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे आदेशात म्हटले आहे.

दरम्यान, दुचाकीस्वार आणि त्याच्या मागे बसलेल्या प्रवाशाने हेल्मेट वापरले नाही तर, त्यांच्याविरोधात ई-चालान मशीनमध्ये स्वतंत्र हेड खाली कारवाई केली जाणार आहे. परंतु, या आदेशाची अंमलबजावणी नेमकी कधीपासून करण्यात येणार आहे. याची तारीख जाहीर केलेली नाही.

शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर दुचाकीस्वार विनाहेल्मेट प्रवास करत असल्याचे दिसून आले आहे. त्यासोबतच दुचाकी अपघातांमध्ये गंभीर दुखापत होऊन, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. राज्यात मागील ५ वर्षांतील रस्ते अपघातांचा आढावा घेतला असता, विनाहेल्मेट दुचाकीचालक व सहप्रवाशाचे अपघात, मृत्युमुखी व जखमींच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यासोबतच वाहतूक पोलिसांकडून मोटार वाहन कायदा १९८८ मधील तरतुदीप्रमाणे विनाहेल्मेट दुचाकी चालकासह सहप्रवाशाविरोधात प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे विनाहेल्मेट दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेल्या सहप्रवाशावर कारवाईचे आदेश अपर पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षकांना दिले आहेत.

हेल्मेटसक्ती अन् पुणेकरांचा विरोध...

राज्यासह अनेक महत्त्वाच्या शहरात हेल्मेटसक्तीला वारंवार विरोध झाल्याचे दिसून आले आहे. आता दुचाकीस्वारांचे वाढते अपघात लक्षात घेऊन संबंधितांनी हेल्मेट परिधान करण्यासाठी प्राधान्य द्यावे, यासाठी पोलिस प्रशासनाने मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार आदेशाची अंमलबजावणी पुण्यातही केली जाण्याची शक्यता आहे. सध्या वाहतूक पोलिस सीसीटीव्हीच्या माध्यमातून विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई करत आहेत. दरम्यान, अपर पोलिस महासंचालकांच्या आदेशानुसार विनाहेल्मेट दुचाकीस्वार, सहप्रवासी कारवाईच्या जाळ्यात अडकले जाणार आहे. त्यामुळे याला पुणेकरांचा विरोध होऊ शकतो, अशी शक्यता आहे.

चालू वर्षातील शहरात झालेले अपघात..

पुणे शहरात १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत २७१ अपघात झाले. यामध्ये २७८ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय ५६१ अपघातांमध्ये ६४१ जण गंभीर जखमी झाले आहेत. किरकोळ अपघातांची संख्या २०१ एवढी असून, यामध्ये २६१ जण जखमी झाले आहेत.

Web Title: Pune people getting out on bikes Both must wear helmets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.