Pune Rain: पुणेकरांनो पुढील चार दिवस पावसाचे! ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन नाही होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 12:57 PM2023-06-28T12:57:45+5:302023-06-28T12:57:55+5:30
पुणे येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा
पुणे: शहरात मंगळवार हा पावसाचा दिवस ठरला. दिवसभर झालेल्या रिमझिम पावसाने रस्त्यांवर पाणी साठले. मान्सून सक्रिय असल्याने पुणे जिल्ह्यात दमदार पाऊस होत असून, येत्या २४ तासांमध्येही मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, येत्या चार-पाच दिवसांमध्येही हीच स्थिती राहणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.
आकाशात मोठ्या आकाराचे ढग निर्माण झाले असून, तशी अवस्था येत्या ३० जूनपर्यंत राहणार आहे. म्हणून येत्या दोन-तीन दिवसांमध्ये पुणे शहरातही पावसामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन केले आहे. शहरात दुपारी आकाश पूर्णतः ढगाळ राहणार असून, मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, घाट माथ्यावर अतिवृष्टी होणार आहे.
मान्सून यायला उशीर केला असला तरी आता तो अतिशय वेगाने सक्रिय होऊन देशभर कोसळत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे मान्सून सक्रिय आहे. अरेबियन समुद्रातही हीच स्थिती आहे. त्यामुळे कोकण,नाशिक, मध्य महाराष्ट्रात अलर्ट जारी केला आहे. पुणे व घाट माथ्यावर येत्या ३० जूनपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर तो कमी होईल. पुण्यात ३० जूनपर्यंत निरभ्र आकाश पाहायला मिळणार नाही. मध्यम स्वरूपाचा पाऊस सतत होणार आहे. - अनुपम कश्यपी, प्रमुख, भारतीय हवामानशास्त्र विभाग.
पुण्यातील पाऊस (मिमी)
लवासा : ७०.५
लोणावळा : २१.५
एनडीए १८.०
वडगावशेरी : १०.५
शिवाजीनगर : ७.५
पाषाण : ८.१
कोरेगाव पार्क : ५.०
हडपसर : ४.०
हवेली : १.०
मगरपट्टा : ०.५