Pune | सिंगापूर, दुबई उड्डाणाला पुणेकरांची पसंती; तर बँकॉककडे पाठ
By नितीश गोवंडे | Published: April 18, 2023 08:20 PM2023-04-18T20:20:43+5:302023-04-18T20:21:41+5:30
गेल्या तीन महिन्यांतील विमानतळ प्रशासनाने दिलेल्या प्रवाशांच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते...
पुणे : लोहगाव विमानतळावरून सध्या सिंगापूर, दुबई आणि बँकॉक या देशांसाठी थेट विमानसेवा सुरू आहे. पुणेकरांच्या मागणीनुसार दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या पुढाकाराने या सिंगापूर आणि बँकॉक या दोन देशांतील विमानसेवा सुरू करण्यात आल्या. यापैकी सिंगापूर आणि दुबई विमानसेवेला उत्तम प्रतिसाद मिळत असून, बँकॉककडे प्रवाशांची पाठ फिरविली आहे. गेल्या तीन महिन्यांतील विमानतळ प्रशासनाने दिलेल्या प्रवाशांच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते.
सतरा वर्षांपूर्वी लोहगाव विमानतळावरून दुबई विमानसेवा सुरू करण्यात आली होती. या सेवेला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे, तर २०२२ अखेरीस केंद्रीय हवाई राज्यमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पुण्यातून आंतरराष्ट्रीय सेवा वाढविण्याची घोषणा केली होती. त्यानुसार पुण्यातून सिंगापूर आणि बँकॉकला सेवा सुरू झाली. तेव्हापासून सिंगापूरला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, बँकॉकची सेवा मात्र बंद होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती हवाई वाहतूक तज्ज्ञांनी दिली.
जानेवारी ते मार्चदरम्यान विमान प्रवास केलेले प्रवासी...
- बँकॉक - २२६ प्रवासी गेले - ४९३ प्रवासी आले
- दुबई - १६ हजार २२२ प्रवासी गेले - १५ हजार ९९ प्रवासी आले
- सिंगापूर - ७ हजार ५५९ प्रवासी गेले - ५ हजार ८१६ प्रवासी आले
...म्हणून पुणेकर टाळताहेत थेट ‘पुणे-बँकॉक वारी’
मुळात बँकॉकला हवे तसे अय्याशी आयुष्य जगण्याचा देश म्हणून ओळखले जाते. या देशात अनेक बाबींवर निर्बंध नसल्याने, तसेच आपल्या देशात ज्या गोष्टी बेकायदेशीर म्हणून ओळखल्या जातात, त्या गोष्टी बँकॉकला कोणत्याही निर्बंधाशिवाय एन्जॉय करता येतात. त्यामुळे अनेकजण बँकॉकला जाताना तिथे चाललोय हे सांगणे टाळतात; तसेच पुण्याहून येण्या-जाण्याचे तिकीट २२ ते २६ मेदरम्यान २५ हजार ५४२ रुपये आहे, तर मुंबईहून याच तारखेदरम्यान २३ हजार १२२ रुपये आहे. याशिवाय मुंबईवरून ८ तास ५ मिनिटात बँकॉकला पोहोचता येते, तर पुण्याहून १४ तास ५५ मिनिटे लागत असल्याचे ऑनलाइन संकेस्थळावरून दिसून आले. कदाचित, या कारणामुळे देखील पुणेकर बँकॉकला जाण्यासाठी अन्य शहरांतून विमानाचा पर्याय निवडतात, अशी माहिती आंतरराष्ट्रीय सहलींचे आयोजन करणाऱ्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या चालकांनी दिली.