पुणे-फार्मा’ एक नवा ब्रँड...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:08 AM2021-07-01T04:08:26+5:302021-07-01T04:08:26+5:30

देशातील फार्मसी महाविद्यालय व विद्यार्थी प्रवेशक्षमता १) डी. फार्म ३१५० (१.९० लाख) २) बी. फार्म २२४८ (१.६७ लाख) ३) ...

Pune-Pharma's a new brand ... | पुणे-फार्मा’ एक नवा ब्रँड...

पुणे-फार्मा’ एक नवा ब्रँड...

Next

देशातील फार्मसी महाविद्यालय व विद्यार्थी प्रवेशक्षमता

१) डी. फार्म ३१५० (१.९० लाख)

२) बी. फार्म २२४८ (१.६७ लाख)

३) फार्म. डी. २७१ (८,१३०)

४) एम. फार्म ८५० (२६,८५०)

५) बी. फार्म प्रॅक्टिस ३५ (१,४२०)

फार्मसी महविद्यालयांमधून फार्मासिस्टची सक्षम पिढी भारतीत निर्माण होत आहे. पुण्यात १९६३ मध्ये इंडियन फार्मास्र्युटिकल असोसिएशनने पूना कॉलेज ऑफ फार्मसी या डी. फार्म. महाविद्यालयाची स्थापना केली. त्यानंतर हे महाविद्यालय भारती विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्यात आले. पुढे केवळ तीन वर्षांतच येथे ४ जुलै १९८१ रोजी पदवी अभ्यासक्रम सुरू झाले. पूर्वी पाच जिल्हे समाविष्ट असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील हे पहिले व महाराष्ट्रातील सहावे फार्मसी महाविद्यालय आहे.

पुणे विद्यापीठ अंतर्गत फक्त तीन फार्मसी कॉलेज असताना स्वतंत्र फार्मसी फॅकल्टीची निर्मिती व त्यानंतर त्याचा चार अभ्यासमंडळात विस्तार करणे; यामुळे फार्मसी कॉलेजला मंजुरी मिळणे, अभ्यासक्रम तयार करणे व संशोधनाला चालना देणे सुलभ झाले. पुणेकरांना अभिमान हवा की पूना कॉलेज ऑफ फार्मसीच्या यशस्वी प्रयोगामुळे १९९० पासून अनेक फार्मसी महाविद्यालये सुरू झाली. पुणे जिल्ह्यात ५४ डी. फार्म. तर, पुणे विद्यापीठ क्षेत्रात ७३ बी.फार्म. महाविद्यालये आहेत. त्यात ५७ पुणे विद्यापीठांतर्गत असून १६ महाविद्यालये बाटू विद्यापीठाशी संलग्न आहेत. तर, राज्यात ३८० फार्मसी महाविद्यालये असून त्यांची एकूण प्रवेश क्षमता ७ हजार ५०० आहे.

जवळपास प्रत्येक महाविद्यालयात एम. फार्म. व संशोधनाची सोय उपलब्ध असून, प्रथम अभ्यासक्रम चालू करण्याची परंपरा जपत भारती विद्यापीठाने २००९ मध्ये महाराष्ट्रात प्रथम डॉक्टर ऑफ फार्मसी अभ्यासक्रम सुरू केला. पुण्यामधील फार्मसी शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये विशेष सहयोग दिसून येतो. याचमुळे इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस २००४, ॲप्टीकॉन २०१४ अशा राष्ट्रीय परिषद पुण्यामध्ये पार पडल्या. पुण्यातील सर्व फार्मसी महाविद्यालय व आयुष कंपन्या एकत्रितपणे येत ऑगस्ट महिन्यात जागतिक पातळीवरील आठवी इथनोफाॅर्मकॉलॉजी कॉन्फरन्स आयोजित करत आहेत.

सक्षम मनुष्यबळ असेल तरच देशाची प्रगती वेगात होऊ शकते. त्यामुळेच सध्या पुण्यात दहा हजाराच्या जवळपास रिटेल फार्मसी आहेत. औषधांचा दरमहा व्यवसाय साधारणत: दोनशे कोटींपर्यंत होतो. औषध निर्मितीमध्ये १९५४ च्या हिंदुस्तान अँटिबायोटिक ते लिब्रा, एमक्युअर, न्यूलाईफ अशा सुमारे २० कंपन्या; तर लुपिन, सावा ही संशोधन केंद्रे पुण्याचा नावलौकिक वाढवत आहेत. ‘सीरम’ने लसनिर्मिती क्षेत्रात पुण्याला जगाच्या नकाशावर पोहोचवले आहे. आयुर्वेदिक व हरबल औषधांमध्ये सुद्धा पुणे अग्रेसर आहे. त्यामध्ये शारंगधर, इंदूकेअर, इंडस बायोटेक ते बीव्हीजी लाइफ सायन्सेस अशा २५ औषध कंपन्या आहेत.

गेल्या चाळीस वर्षांत पूना कॉलेज ऑफ फार्मसीसह इतर काही फार्मसी महाविद्यालयांनी निर्माण केलेल्या दिशादर्शक कामामुळे फार्मसी महाविद्यालये सध्या अनेक औषध कंपन्यांची संशोधन प्रयोगशाळा बनत आहेत. भविष्यात एकत्रित व सामूहिक प्रयोगशाळा यंत्रसामग्रीचा वापर करून पुण्यातील औषध क्षेत्राला भरारी देण्याचे काम करता येईल. त्यामुळे पुण्याची ओळख ‘आयटी हब’नंतर आता पुणे-फार्मा हा ब्रँड नव्याने स्थापन होऊ शकतो. यात काही शंका नाही.

-डॉ. आत्माराम पवार, संयोजक, इंडियन फर्माचेऊटिकल असोसिएशन, पुणे

-----------------------

Web Title: Pune-Pharma's a new brand ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.