'फुले' सिनेमा जसा आहे तसा प्रदर्शित व्हावा; प्रकाश आंबेडकरांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 13:03 IST2025-04-11T13:02:12+5:302025-04-11T13:03:14+5:30
प्रकाश आंबेडकरांचा सेन्सर बोर्डावर संताप, आंदोलनाचा दिला इशारा

'फुले' सिनेमा जसा आहे तसा प्रदर्शित व्हावा; प्रकाश आंबेडकरांची मागणी
पुणे - महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित आणि प्रतीक गांधी व पत्रलेखा यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'फुले' हा आगामी सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सिनेमातील काही दृश्यांवर सेन्सर बोर्डाने आक्षेप घेतल्यामुळे या चित्रपटाची प्रदर्शन तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. या निर्णयावरून सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त फुलेवाड्यात आयोजित कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनीही यावर संताप व्यक्त केला. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "सेन्सर बोर्डमध्ये वेगवेगळे मान्यवर आहेत. समाजावर परिणाम होईल का याची तपासणी केली जाते, पण संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे. चित्रपटातून कुठे तेढ निर्माण होणार नाही, हे पाहणं महत्त्वाचं आहे."
ते पुढे म्हणाले, सेन्सर बोर्डला विरोध करण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. जर सेन्सर बोर्ड आपला विरोध कायम ठेवणार असेल, तर त्या बोर्डाच्या सदस्यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. महात्मा फुलेंचं वाङ्मय सरकारनेच प्रकाशित केलं आहे, त्यावर आधारित सीन काढायला सांगणं म्हणजे विचारस्वातंत्र्यावर गदा आणणं आहे. प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट शब्दांत सेन्सर बोर्डचा निषेध करत म्हटलं, चित्रपटातील सीन हे समग्र वाङ्मयावर आधारित आहेत. जर सेन्सर बोर्डाने लावलेली कात्री काढली नाही, तर आम्ही त्यांच्या कार्यालयावर आंदोलन करू. एकीकडे सरकार अभिवादन करतं, तर दुसरीकडे फुले यांच्या कार्यावर आधारित सिनेमाला विरोध करतं हा विरोधाभास थांबला पाहिजे.
मुख्यमंत्र्यांना दिलं आवाहन
आंबेडकरांनी राज्य सरकारला थेट आव्हान देत म्हटलं, मुख्यमंत्री एकीकडे महात्मा फुलेंना अभिवादन करतायत आणि दुसरीकडे त्यांच्या कार्यावर आधारित चित्रपटाला विरोध होत असेल, तर सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करावी. 'फुले' सिनेमा जसा आहे तसा प्रदर्शित व्हावा, अशी मागणी करत प्रकाश आंबेडकरांनी आंदोलनाचा इशाराही दिला.