स्वच्छ सर्वेक्षणात पुणे, पिंपरी-चिंचवड अव्वल; लोणावळा, सासवड नगरपालिकांनाही पारितोषिक
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: January 6, 2024 12:32 PM2024-01-06T12:32:28+5:302024-01-06T12:32:53+5:30
जिल्ह्यातील लोणावळा, सासवड नगरपालिकांनीही स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल स्थान पटकावले आहे....
पिंपरी : केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांना राष्ट्रीय स्तरावर अव्वल स्थान प्राप्त झाले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गुरुवारी (दि. ११) दिल्लीमध्ये पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील लोणावळा, सासवड नगरपालिकांनीही स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल स्थान पटकावले आहे.
केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत देश पातळीवर शहरांच्या स्वच्छतेबाबतचे परीक्षण करण्यात आले. नागरिकांचा प्रतिसाद ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला. त्यासाठी दिलेली ‘लिंक ओपन’ करून त्यात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची होती. या गुणतालिकेत कचरामुक्त शहरामध्ये पिंपरी-चिंचवड शहराला पाच स्टार तर हागणदारीमुक्त शहर विभागात सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे.
असे झाले सर्वेक्षण...
सर्वेक्षणाच्या पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. स्वच्छ शहराबाबत दूरध्वनी व सोशल मीडियावरून संवाद साधून त्यांचे अभिप्राय मागविले. स्वच्छ शहरासाठी साडेसात हजार गुण होते. त्यासाठी विभागानुसार गुणांची विभागणी केली जाते. निरीक्षण, नागरिकांचा प्रतिसाद, स्वच्छ सुधारणा आणि हागणदारीमुक्त शहर व स्टार रेटिंग अशा चार विभागांसाठी गुण दिले जातात.
पुण्यासह लोणावळा, सासवडही अव्वल
या पुरस्काराअंतर्गत पुणे जिल्ह्यात पुणे महापालिका व पिंपरी-चिंचवड महापालिका तर लोणावळा व सासवड या दोन नगरपालिका राष्ट्रीय स्तरावर अव्वल ठरल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड पहिल्यादांच अव्वल
कचरामुक्त शहर व हागणदारीमुक्त विभागामध्ये पिंपरी-चिंचवड शहराला पहिल्यादाच पुरस्कार मिळाला आहे. मागील सात वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षणातील पिंपरी-चिंचवड शहराच्या रँकिंगचा आलेख चढता, उतरता राहिला आहे. २०१६ मध्ये शहराचा देशात ९ वा क्रमांक आला होता. २०१७ मध्ये शहर थेट ७२ व्या क्रमांकावर फेकले गेले होते. २०१८ मध्ये थोडी सुधारणा होत ४३ वा क्रमांक आला. पुन्हा २०१९ मध्ये शहराची घसरण झाली आणि ५२ वा क्रमांक आला. २०२० मध्ये सुधारणा होत २४ वा क्रमांक आला. २०२१ मध्ये आणखी सुधारणा होत १९ वा क्रमांक आला. २०२२ मध्येही १९ वाच क्रमांक आला आहे.
स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये पिंपरी-चिंचवड शहर देशात अव्वल स्थानावर येण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये विविध स्पर्धा, स्वच्छतेसाठी मोहिमांवर काम करण्यात आले. सफाई कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण सत्र झाले.
- शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका