पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील २७ महापालिकांच्या महापौरपदासाठी आज आरक्षण सोडत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 12:31 PM2019-11-13T12:31:33+5:302019-11-13T12:35:07+5:30
पुण्याचे महापौरपद ओबीसी की अनुसूचित जातीचे आरक्षण उत्सुकता
पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील सुमारे २७ महापालिकांमधील पुढील अडीच वर्षांसाठी महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत बुधवार (दि.१३) रोजी होणार आहे. पुण्याचे महापौरपद रोटेशननुसार ओबीसी (पुरुष) की अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठी आरक्षित होणार? याकडे सत्ताधारी भाजपमधील सर्वच इच्छुकांचे लक्ष लागले आहे. आरक्षण निश्चित झाल्यानंतरच नक्की कुणाला मिळू शकते, हे स्पष्ट होईल.
सध्या पुणे महापालिकेत भारतीय जनता पार्टीचे निर्विवाद बहुमत आहे. पहिल्या टर्ममध्ये महापौरपद सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित होते. भाजपच्या पहिल्या महापौर म्हणून मुक्ता टिळक यांना पक्षाने काम करण्याची संधी दिली. मुक्ता टिळक यांचा महापौरपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ १४ सप्टेंबर २०१९ रोजी संपुष्टात आला; परंतु दरम्यानच्या काळात विधानसभा निवडणुकांची धावपळ सुरू होती. यामुळे संपूर्ण राज्यातच महापौर पदाचा कालावधीची मुदतवाढ दिली. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर, त्वरित ही सोडत जाहीर होणार होती. परंतु, सध्या राज्यात सत्तास्थापनेचा घोळ सुरूच आहे. पुण्यासह राज्यातील २७ महापालिकांच्या महापौरपदाची आरक्षण सोडत बुधवार (दि.१३) रोजी दुपारी ३ वाजता प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात काढणार आहे.
.......
पुणे महापालिकेच्या २०१२ ते सन २०१७ या टप्प्यामध्ये सुरुवातीच्या अडीच वर्षांत नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) गटातील महिलांसाठी महापौरपद राखीव होते, तर त्यानंतरच्या अडीच वर्षांमध्ये ते सर्वसाधारण गटासाठी खुले झाले. सध्या ते सर्वसाधारण गटातील महिलांसाठी आरक्षित असल्याने आता पुढील टप्प्यात तिथे ओबीसी (पुरुष) की अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गाचे आरक्षण पडणार, याविषयी उत्सुकता आहे.