पुणे पिंपरीकरांच्या खिशाला कात्री! एसटी पाठोपाठ पीएमपी देखील भाडेवाडीचा धक्का देणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 11:11 IST2025-01-28T11:09:31+5:302025-01-28T11:11:11+5:30
पीएमपीची संचलन तूट सातशे कोटी रुपयांवर, खर्चाचा डोलारा वाढला

पुणे पिंपरीकरांच्या खिशाला कात्री! एसटी पाठोपाठ पीएमपी देखील भाडेवाडीचा धक्का देणार?
पिंपरी : इंधनाचे वाढते दर, वाहनांच्या सुट्या भागाच्या वाढत्या किमती आणि कर्मचाऱ्यांची झालेली पगारवाढ यामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाची संचलन तूट २०१६-१७ च्या तुलनेत २०२३-२४ मध्ये तब्बल ४९६.४४ कोटींनी वाढ झाली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेला पीएमपीच्या खर्चाचा डोलारा वाढत चालल्याने भाडेवाढ अटळ मानली जात आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात साधारण १,७०० बसच्या माध्यमातून पीएमपीकडून सेवा दिली जाते. यातून दररोज दहा ते बारा लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवासी वाहतूक व इतर माध्यमातून पीएमपीला २०२३-२४ मध्ये ६६९ कोटींचे उत्पन्न मिळाले. २०२२-२३ च्या तुलनेत उत्पन्नात ६० कोटींनी वाढ झाली आहे. याच वर्षात पीएमपीचा एकूण खर्च १ हजार ४६७ कोटी रुपये झाला आहे. २०२२-२३ च्या तुलनेत खर्चात मात्र १५३ कोटींनी वाढ झाली आहे.
पीएमपीचा उत्पन्नाच्या तुलनेत खर्चच दुप्पट होत असल्याने संचलन तूट ७०० कोटींच्या घरात गेली आहे. पीएमपीला पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेकडून अनुक्रमे ६०:४० या प्रमाणात संचलन सूट दिली जाते. पण, आता संचलन तूट दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पीएमपीची भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील नागरिकांचा प्रवास महागणार आहे.
पीएमपीचे तिकीट दर किती?
पीएमपीकडून सध्या पहिल्या दीड किमीसाठी पाच रुपये, तर तीन किमीसाठी १० तिकीट आकारले जात आहे. पण, दिवसेंदिवस वाढता खर्च लक्षात घेता पाच ते सात रुपये भाडेवाढ होण्याची शक्यता आहे.
इंधन किमती दीडपट ते दुप्पट वाढल्या
२०१६ नंतर पेट्रोल, डिझेल, सीएनजीच्या किमतीत बरीच वाढ झाली. जुलै २०१६ मध्ये डिझेल प्रतिलिटर ६०.४९ रुपये, सीएनजी प्रतिकिलो ४० रुपये होता. जानेवारी २०२५ मध्ये डिझेल प्रतिलिटर ९०.३५ आणि सीएनजी प्रतिकिलो ८९ रुपये झाला आहे. आठ वर्षांत डिझेलच्या किमती प्रतिलिटर ३० रुपयांनी तर सीएनजी प्रतिकिलो ५० रुपयांनी वाढला आहे. इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे खर्चही वाढत आहे.
२०१६ मध्ये शेवटची दरवाढ
पीएमपीची शेवटची तिकीट दरवाढ २०१६ मध्ये झाली होती. पहिल्या टप्प्यात ५ रुपये आणि दुसऱ्या टप्प्यात १० रुपये अशी पाचच्या टप्प्यामध्ये तिकीट दरवाढ झाली होती. गेल्या नऊ वर्षांत इंधनाच्या किमती, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि सुटे भाग यांच्या किमतीत मोठी वाढ झाली. मात्र, तिकीट दर जैसे-थे ठेवण्यात आल्याने पीएमपीचा तोटा वाढत चालला आहे.
सातवा वेतन आयोगामुळे खर्चात १५३ कोटींनी वाढ
पीएमपीमध्ये नऊ हजारांपेक्षा अधिक अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. पीएमपीमधील कामगारांना सातवा वेतन आयोग फरकासहित लागू करण्याबाबत २०२१ मध्ये तत्कालीन संचालक मंडळाने मान्यता दिली. त्यानंतर डिसेंबर २०२२ पासून सातवा वेतन आयोग दोन टप्प्यात लागू करण्यात आला. सातवा वेतन आयोग लागू केल्यामुळे खर्चात १५३ कोटींनी वाढ झाली आहे.
पीएमपीची संचलन तूट
२०१६-१७ - २१०.४४
२०१७-१८ - २०४.६१
२०१८-१९ - २४७.०४
२०१९-२० - ३१५.१०
२०२०-२१ - ४९४.१६
२०२१-२२ - ७१८.९७
२०२२-२३ - ६४६.५३
२०२३-२४ - ७०६.८८