पुणे : बांधकाम व्यावसायिकाच्या खुनाचा कट उघर्ड : नगरमधून आरोपीच्या मुसक्या आवळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 06:51 AM2017-11-16T06:51:14+5:302017-11-16T06:51:35+5:30
एका खुनाच्या प्रकरणाच्या तपासासाठी अहमदनगरला गेलेल्या पोलीस पथकाने शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या खुनाचा कट उधळला.
पुणे : एका खुनाच्या प्रकरणाच्या तपासासाठी अहमदनगरला गेलेल्या पोलीस पथकाने शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या खुनाचा कट उधळला. या प्रकरणी एका सराईत गुन्हेगारासह दोघांना दरोडा प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. या खुनासाठी एक कोटींची सुपारी घेतल्याचे उघड झाले आहे.
ओंकार ऊर्फ बंटी बेंद्रे (रा. चिलवडी, राशीन, ता. कर्जत, जि. नगर) व नितीनकुमार मच्छिंद्र पिसे (रा. भिगवण रेल्वे स्टेशन, इंदापूर) यांना ताब्यात घेतले आहे. विश्रांतवाडी येथे दाखल खुनाच्या तपासासाठी दरोडा प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम हे अहमदनगरला गेले होते. त्या वेळी खबºयामार्फत त्यांना नगरमधील सराईत गुन्हेगार बेंद्रे व बंडू मासाळ यांनी हडपसर येथील एका बांधकाम व्यावसायिकाच्या खुनाची सुपारी घेतल्याची माहिती मिळाली. सुपारीच्या एक कोटी रकमेपैकी १५ लाखांची आगाऊ रक्कमदेखील त्यांनी घेतली होती. त्यानुसार या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार आनंद शिवकुमार भोपे (रा. अमनोरा पार्क, हडपसर) याला ताब्यात घेण्यात आले आहे. भोपे आणि त्याचा मित्र जमीन खरेदी-विक्री व्यवहार करतात. बांधकाम व्यावसायिकाने त्यांना जमिनीचा व्यवहार करण्यासाठी कुलमुखत्यारपत्र दिले होते.
मात्र, या दोघांनी खोट्या स्वाक्षºया करून खरेदीचे काही व्यवहार परस्पर केले होते. हा प्रकार उघड होऊ नये म्हणून, त्यांनी खुनाचा कट रचल्याचे समोर आले आहे. सुपारी घेणारा बेंद्रे याच्यावर अहमदनगरमध्ये खुनाचा गुन्हा दाखल असून, तो या प्रकरणी दीड वर्षांपासून फरार आहे.