रुतलेली ‘पीएमपी’ मार्गावर; प्रवासी संख्येत ५० हजारांची, तर उत्पन्नात ७ लाख रुपयांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 12:01 PM2017-12-09T12:01:05+5:302017-12-09T12:11:28+5:30
शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बससेवा हळूहळू मार्गावर येऊ लागली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत दैनंदिन प्रवासी संख्येमध्ये सुमारे ५० हजारांची म्हणजे उत्पन्नात सुमारे ६ लाख ९० हजारांनी वाढ झाली आहे.
पुणे : शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बससेवा हळूहळू मार्गावर येऊ लागली आहे. मागील काही महिन्यांपासून मार्गावरील बस, प्रवासी संख्या, उत्पन्नामध्ये सातत्यपूर्ण वाढ होताना दिसत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत दैनंदिन प्रवासी संख्येमध्ये सुमारे ५० हजारांची म्हणजे उत्पन्नात सुमारे ६ लाख ९० हजारांनी वाढ झाली आहे.
‘पीएमपी’ची निर्मिती झाल्यापासून विविध कारणांमुळे तोट्यात भर पडत गेली. राजकीय हस्तक्षेप आणि त्यामुळे अधिकाऱ्यांना काम करताना येणाऱ्या मर्यादा, निधीची कमतरता, बसेसच्या दुरवस्थेमुळे वाढणारा तोटा, रखडलेला आस्थापना आराखडा, बेशिस्त, ठेकेदारी पद्धतीमुळे वाढलेला खर्च अशी विविध कारणे पीएमपीच्या अधोगतीला जबाबदार ठरली. त्यातच अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांची पूर्णवेळ नियुक्ती केली जात नव्हती. तुकाराम मुंढे यांची मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात अध्यक्षपदी निुयक्ती झाल्यानंतर त्यांनी पहिल्या दिवसापासून यंत्रणेत आमूलाग्र बदल करण्यासाठी पावले टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे झालेला बदल आता प्रकर्षाने जाणवू लागले आहेत. कर्मचारी-अधिकाऱ्यांना शिस्त लावण्यापासून मार्गावर बस वाढविणे, बसेसची स्थिती सुधारण्यासाठी विविध पातळ्यांवर वेग आणल्याने स्थिती सुधारत असल्याचे चित्र आहे.
पीएमपी प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मागील वर्षाच्या तुलनेत मार्गावरील बस संख्येत वाढ झाली आहे. मुंढे यांनी पदभार स्वीकाला त्या वेळी एप्रिल महिन्यात दैनंदिन बसची संख्या १३६८ एवढी होती. नोव्हेंबर महिन्यात हा आकडा १४४० वर पोहोचला आहे. सरासरी दैनंदिन तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नात सात लाखांहून अधिक वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नोव्हेंबरपर्यंत तिकीट विक्रीतून १ कोटी २० लाख रुपयांचे दैनंदिन उत्पन्न मिळत आहे.
तर पाससह इतर बाबींमधून मिळणारे एकूण उत्पन्न सुमारे दीड कोटी रुपये आहे. एका बाजूला उत्पन्न वाढत असताना प्रवाशी संख्याही वाढत चालली आहे.
तीन वर्षांतील नोव्हेंबर महिन्याची स्थिती
२०१५ २०१६ २०१७
मार्गावरील सरासरी बस १४३१ १३७१ १४२२
एकूण उत्पन्न ४५५२७२७९६ ४४३६३८३८५ ४६५७८३९९
एकूण दैनंदिन प्रवासी १११५९७७ १०६७४१६ ११६८५१३
प्रवाशांमध्ये वाढ
पीएमपीची तुलनात्मक स्थिती
२०१६ २०१७
मार्गावरील सरासरी बस १३८४ १४२४
एकूण किलोमीटर ७,२८,६८,६५६ ७,६४,३५,९५३
तिकीट विक्रीतून उत्पन्न २७५,९७,०६,२१५ २९३,२६,३४,३९६
तिकीट विक्रीतून दैनंदिन उत्पन्न १,१३,१०,२७१ १,२०,१८,९९३
एकूण उत्पन्न ३५०,६१,१५,७९५ ३६७,४५,४६,९७५
एकूण दैनंदिन उत्पन्न १,४३,६९,३२७ १,५०,५९,६१९
एकूण दैनंदिन प्रवासी १०,१८,७९१ १०,६६,१०२