Pune Police: शहरात ७ नवीन ठाणी; पुणे पोलीस दलात भरणार कंत्राटी पद्धतीने पोलीस कर्मचारी
By विवेक भुसे | Published: July 25, 2023 11:20 AM2023-07-25T11:20:31+5:302023-07-25T11:20:48+5:30
शहर पोलीस दलात ७ हजार पोलीस कर्मचारी असून ८०० पोलीस कर्मचार्यांची नुकतीच भरती करण्यात आली
पुणे : शहर पोलिस दलात नव्याने ७ पोलीस ठाणी होणार असून आताच मोठ्या प्रमाणावर पोलीस अंमलदारांची कमतरता जाणवत असताना या नवीन ७ पोलीस ठाण्यांच्या निर्मितीमुळे आणखी उणीव भासणार आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून हंगामी तत्वावर पोलीस कर्मचारी भरण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर ३ हजार पोलीस कर्मचार्यांची कमतरता आहे. सर्व विहित मार्गाने प्रत्यक्ष भरती प्रक्रिया व प्रशिक्षण पूर्ण होऊन प्रत्यक्ष कर्तव्यासाठी २ वर्षानंतर आयुक्तालयास उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे हे मनुष्यबळाची कमतरता भरुन काढण्यासाठी ३ हजार कर्मचारी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून घेण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसा आदेश काढण्यात आला आहे. या कर्मचार्यांची मुदत ११ महिन्यांची राहणार आहे.
याबाबत पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी सांगितले, मुंबई पोलीस आयुक्तालयाला अशा प्रकारे मनुष्यबळ भरण्यास मंजुरी मिळाल्याची माहिती झाली आहे. त्यांनी कशा प्रकारे प्रस्ताव पाठविला होता, याची माहिती घेण्यात येईल. पुणे शहर पोलीस आयुक्तालयात नवीन ७ पोलीस ठाण्यांची निर्मिती नजीकच्या काळात होणार आहे. त्यासाठीही नवीन मनुष्यबळाची आवश्यकता लागणार आहे. याचा विचार करुन मुंबईच्या प्रस्तावाप्रमाणे शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी सदाशिव पेठेत तरुणीवर कोयत्याने वार करण्यात आला होता. त्यावेळी पेरुगेट पोलीस चौकीत कोणीही पोलीस कर्मचारी उपलब्ध नव्हता. त्यावेळी अपुर्या पोलीस कर्मचार्यांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. शहर पोलीस दलात ७ हजार पोलीस कर्मचारी असून ८०० पोलीस कर्मचार्यांची नुकतीच भरती करण्यात आली आहे. सध्या त्यांचे प्रशिक्षण सुरु आहे.