Pune Police: जनता वसाहतमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईतावर एमपीडीएअंतर्गत कारवाई
By नितीश गोवंडे | Published: January 25, 2024 08:23 PM2024-01-25T20:23:30+5:302024-01-25T20:24:07+5:30
पुणे : पर्वती पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार शुभम प्रमोद शिंदे (२६, रा. मध्यवर्ती मंडळाजवळ, जनता ...
पुणे : पर्वती पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार शुभम प्रमोद शिंदे (२६, रा. मध्यवर्ती मंडळाजवळ, जनता वसाहत) याच्याविरुद्ध पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.
शुभम शिंदे हा पर्वती पोलिस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याने विश्रामबाग व पर्वती पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजवली होती. आरोपीने त्याच्या साथीदारांसह संबंधित पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये चाकू, कोयता यासारख्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, दुखापत, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. तसेच त्याच्यावर २ गंभीर गुन्हेदेखील दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भीतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.
आरोपी शुभम शिंदे याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पर्वती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी पोलिस आयुक्तांना पाठवला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करून पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी शुभम शिंदे याला एमपीडीए कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, गुन्हे शाखा, पीसीबीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत बेदरे, पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली.