पुणे पोलिसांना गुंगारा देणारे खुन प्रकरणातील दोन आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2022 08:02 PM2022-06-19T20:02:42+5:302022-06-19T20:02:48+5:30
आष्टी पोलिसांनी आवळल्या कड्यात मुसक्या
कडा : हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात कारणावरून खून करून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या २ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. गौरव कारकिले, राजु सोनवणे दोघे (रा.महादेवनगर हडपसर पुणे) अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस ठाणे हद्दीत मांजरी परिसरातील गणेश निवास अलाहाबाद बॅकेच्या बाजुला महादेव नगर येथे ५ जुन रोजी सागर गिरीधर दासमे (वय वर्ष २७) यांचा अज्ञात कारणावरून आरोपी गौरव कारकिले, राजु सोनवणे यांनी खून केला होता. हडपसर पोलीस ठाण्यात सागर दामसे यांचा भाऊ लखन गिरीधर दासमे याच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा पासून सदरील आरोपी हे पुणे पोलिसांना गुंगारा देत फिरत होते. पुणे पोलिसांनी आरोपीचे वर्णन व माहिती आष्टी पोलिसांना दिल्याने आष्टी पोलिसांनी पाळत ठेवून नगरवरून बीडकडे जात असताना रविवारी दुपारी अखेर त्या खुन प्रकरणातील दोन आरोपीच्या कडा येथील जुन्या बसस्थानक परिसरात मुसक्या आवळल्या. आष्टी पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर, पोलीस निरीक्षक सलिम चाऊस याच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेद्र पवार, पोलिस हवालदार बाबासाहेब गर्जे, बाबासाहेब राख, पोलिस शिपाई बंडु दुधाळ, महेश जाधव, पोलिस मित्र सचिन औटे यांनी केली.