पुणे पोलिसांची मोठी कारवाई, २ सराईत दरोडेखोर जेरबंद; ४ मोठे गुन्हे उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 11:17 PM2021-02-26T23:17:21+5:302021-02-26T23:18:26+5:30
पुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा आणि वडगाव निंबाळकर पोलिसांनी संयुक्तरित्या मोठी कारवाई केली आहे.
बारामती दि २७ (प्रतिनिधी )
पुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा आणि वडगाव निंबाळकर पोलिसांनी संयुक्तरित्या मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी इंदापूर काटी येथील दरोडा आणि वडगाव निंबाळकर येथील दरोडा, घरफोडी, जबरी चोरी असे चार गुन्हे उघड करीत दोघा दरोडेखोरांना जेरबंद केले आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इंदापूर पोलिस स्टेशन ठाण्यात दाखल गुन्ह्यात आरोपीनी काटि येथे दरोडा टाकताना दरवाज्यावर दगड टाकून घरात प्रवेश केला . फिर्यादी महिला आणि घरात असलेली लहान मुलीला कोयत्याचा धाक दाखवून घरातील सोन्या चांदीचे दागिने आणि मोबाईल असा एकूण १ लाख ७ हजार रु किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. तसेच वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात देखील आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून सोन्या चांदीचे दागिने , २ मोबाईलसह ऐकून २लाख १६ हजार रु किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता .
सर्व गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच रेकॉर्डवरील आरोपींची माहिती घेतली. यावेळी गोपनीय माहितीवरून विकास किरण शिंदे (वय २५, वर्षे रा. नांदल ता.फलटण जि.सातारा) , रावश्या कोब्या काळे (वय २५ वर्षे रा.काटी ता.इंदापूर जि. पुणे )यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता वरील दोन्ही ठिकाणचे दरोडे आणि घरफोडी तसेच जबरी चोरीचा गुन्हा कबुल केला आहे.
दोन्ही आरोपींना पुढील तपास कामी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. आरोपीचा शोध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू आहे. पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख , अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांचे मार्गदशनखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट पोलिस उप निरीक्षक शिवाजी ननवरे , पोलिस हवालदार अनिल काळे, रविराज कोकरे पोलिस नाईक राजू मोमिन, विजय कांचन, अभिजित एकशिंगे, धिरज जाधव तसेच वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन चे प्रभारी अधिकारी सोमनाथ लांडे आदींनी कारवाईत सहभाग घेतला.