गुटखा प्रकरणी मुख्य उत्पादक छाजेड बंधुंना पुणे पोलिसांनी केली मुंबईतून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 09:26 AM2021-01-12T09:26:54+5:302021-01-12T09:27:29+5:30
पुणे पोलिसांनी मागील दोन महिन्यात २८ ठिकाणी छापे टाकून १५ कोटी रुपयांहून अधिकचा अवैध गुटखा जप्त केला होता.
पुणे : पुणेपोलिसांनी गुटखा विरोधी मोहिमेअंतर्गत गुजरात राज्यातील वापी आणि दादर नगर हवेलीतील सिल्व्हासा या ठिकाणी छापे टाकून तब्बल १५ कोटी रुपयांहून अधिकचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी सिल्व्हासा येथील कारखान्यात गुटख्याचे उत्पादक करणाऱ्या छाजेड बंधुंना पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत ७ जणांना अटक केली असून शहरात येणाऱ्या गुटख्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.
अभिषके सुरेंद्र छाजेड (वय ३१) आणि शरण सुरेंद्र छाजेड (वय २६, रा. ग्रीन एकर, लोखंडवाला कॉम्पेक्स) अशी अटक केलेल्या मुख्य उत्पादकांची नावे आहेत. याप्रकरणी अनुष्का ट्रान्सपोर्टचा प्रदीप शर्मा, सुरक्षा व्यवस्थापक संतोषकुमार चौबे, मिथून नवले (रा. गणेशनगर), विकास कदम (रा. मांजरी), सतीश वाघमारे (रा. उंड्री) यांनाही अटक करण्यात आली आहे.
सिल्व्हासा येथील गलोंडत्त गावात ज्या कारखान्यात गुटख्याचे उत्पादन होते. ती जागा गोवा गुटख्याचे मालक जगदीशप्रसाद जोशी यांच्या मालकीची आहे. छाजेड बंधुंनी ती भाडेतत्वावर घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांची काशी व्हेंचर्स नावाने कंपनी आहे.
पुणे पोलिसांनी मागील दोन महिन्यात २८ ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणावर अवैध गुटखा जप्त केला होता. त्यातील आरोपींच्या चौकशीत हा गुटखा वापी व दादरा नगर हवेली येथून येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या दोन्ही ठिकाणी कारवाई करुन १५ कोटींहून अधिकचा माल जप्त केला होता. कारखान्यात संतोषकुमार चौबे हा सुरक्षा व्यवस्थापक म्हणून काम पहात होता. कारखान्यात तयार होणारा गुटखा कोठे पाठविला जातो, याची आवक जावकाची सर्व माहिती चौबे ठेवत असे. तो ही माहिती छाजेड बंधुंना पाठवित असे, अशी माहिती तपासात पुढे आली. त्यानंतर पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबईत लोखंडवाला कॉम्पलेक्स येथे कारवाई करुन छाजेड बंधुंना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने दोघांनाही न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे.
या प्रकरणात आणखी काही बडी नावे समोर येण्याची शक्यता आहे.