महात्मा गांधींविषयी वादग्रस्त वक्तव्य करणार्या कालीचरण महाराज यांना पुणे पोलिसांनी घेतले रायपूरहून ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 11:02 AM2022-01-05T11:02:40+5:302022-01-05T11:03:02+5:30
पुणे पोलिसांनी रायपूर तुरुंगातून ताब्यात घेतले असून आज दुपारपर्यंत त्यांना पुण्यात आणण्यात येणार आहे
पुणे: महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणार्या कालीचरण महाराज यांना पुणेपोलिसांनी रायपूर तुरुंगातून ताब्यात घेतले असून आज दुपारपर्यंत त्यांना पुण्यात आणण्यात येणार आहे. पुण्यातील शिवप्रताप दिन कार्यक्रमात समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे, कालीचरण महाराज यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी सांगितले की, कालीचरण महाराज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर गेल्या ३ -४ दिवसांपासून पोलीस पथक रायपूरमध्ये होते. न्यायालयातून ट्रॉझिंट वॉरंट घेऊन मंगळवारी सायंकाळी कालीचरण महाराज यांना ताब्यात घेण्यात आले असून आज दुपारपर्यंत पुण्यात आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल. कालीचरण महाराज यांना घेऊन काल सायंकाळी पोलीस पथक रस्तामार्गे निघाले आहेत. समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यावरही गुन्हा दाखल आहेत. सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहेत.