एलआयसीची रोकड लुटणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी केले जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 09:08 PM2018-05-12T21:08:24+5:302018-05-12T21:08:24+5:30
एल़ आय़ सीची रोकड घेऊन जाणाऱ्या खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला करुन २५ लाख ६१ हजार रुपये भरदिवसा लुटून नेणाऱ्या टोळीतील चौघांना गुुन्हे शाखेच्या युनिट ४ ने अटक केली आहे़
पुणे : एल़ आय़ सीची रोकड घेऊन जाणाऱ्या खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला करुन २५ लाख ६१ हजार रुपये भरदिवसा लुटून नेणाऱ्या टोळीतील चौघांना गुुन्हे शाखेच्या युनिट ४ ने अटक केली आहे़. त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या रक्कमेपैकी १३ लाख ५२ हजार ६५० रुपये तसेच २ मोटारसायकली, मोबाईल असा १५ लाख१६ हजार ५०० रुपयांचा माल जप्त केला आहे़.
मुख्य सुत्रधार राहुल संग्राम वाघमारे (वय २२, रा. सरदार मुरकुटे चाळ, पॅनकार्ड क्लब, बाणेर), महादेव लिंबाजी खापरे (वय २३, रा.बाणेर), सागर ऊर्फ बाळा खताळ (वय २१, रा. जनता वसाहत, जनता वसाहत), सूरज अगरवाल (रा.वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या नावे आहेत. राहुल याची प्रेयसी पूजा चव्हाण (रा.ससाणेनगर, हडपसर) हिच्यासह एका अल्पवयीन मुलाचाही या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे़.
गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस उपायुक्त भानुप्रताप बर्गे, गुन्हे शाखा युनिट ४ चे पोलिस निरीक्षक गणेश पाटील यांनी याविषयी पत्रकार परिषदेत माहिती दिली. चेकमेट कंपनीचे कर्मचारी ३ मे रोजी निगडी येथील यमुनानगर येथून एलआयसीची २५ लाख ६१ हजार रुपयांची रक्कम घेऊन जात होते. त्यावेळी त्यांच्यावर चाकूने हल्ला करून त्यांच्याजवळील रोकड भरदिवसा पळवून नेण्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेकडून सुरु होता़ पोलीस निरीक्षक गणेश पाटील यांना राहुल वाघमारे याने मित्रांबरोबर कट करून एलआयसीची रक्कम लुटली असल्याची माहिती बातमीदारांकडून मिळाली. त्यानंतर भानूप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटील यांनी सहकाºयांच्या समवेत बाणेर येथे सापळा रचून वाघमारे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून अन्य आरोपींची माहिती मिळाली. पोलिसांनी आत्तापर्यंत १३ लाख ५२ हजार रुपये, दोन मोबाईल, दोन दुचाकी असा १५ लाख १६ हजार ६५० रुपयांचा माल जप्त केला.
अशी होती लुटारूंची रणनीती
राहुल वाघमारे हा चेकमेट कंपनीमध्ये काम करत होता. नोव्हेंबर २०१६ मध्ये त्याने त्याच्याकडील कंपनीची रोकड लुटल्याचा बनाव रचला होता. त्या घटनेमध्ये त्याने स्वत:च कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती़. हा गुन्हा पचल्याने त्याने साथीदारांसह पुन्हा गुन्हा करण्याचे धाडस केले़ काही महिन्यांपूर्वी त्याने कंपनीचे काम सोडून दिले होते़ २८ एप्रिल ते १ मे दरम्यान सलग चार दिवस सुट्ट्या असल्याने २ मे रोजी जास्त रक्कम गोळा होईल, याची वाघमारे याला माहिती होती़ त्यानुसार त्याने कॅश व्हॅन लुटण्याचे ठरविले होते़ त्यासाठी ते युमनानगरला आले होते़ परंतु, व्हॅनच्या चालकाने कॅशव्हॅन एल़ आय़ सी कार्यालयाच्या अगदी जवळ पार्क केल्याने त्यांना कॅश लुटता आली नाही़ त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने तिघांच्या मदतीने दरोडा घातला़.