Pune Police | सीसीटीएनएसच्या वापरात पुणे पोलिस राज्यात तळाला; केवळ ३८ टक्के गुण, बीड राज्यात प्रथम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 09:30 AM2023-04-24T09:30:36+5:302023-04-24T09:35:02+5:30
विशेष म्हणजे, बीड हे शहर राज्यात प्रथम आले आहे...
पुणे : देशभरातील गुन्ह्यांची तसेच गुन्हेगारांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या ‘क्राईम क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम’(सीसीटीएनएस) प्रणालीच्या वापरात पुणेपोलिस विभाग अगदीच काठावर पास झाला आहे. शहरातील गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी तसेच अवघड गुन्ह्यांची उकल करण्यासाठी या प्रणालीचा उपयोग होतो. सीसीटीएनएस प्रणालीचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला असून, त्यात पुणे पोलिस राज्यात अगदीच तळाला असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, बीड हे शहर राज्यात प्रथम आले आहे.
देशभरात सीसीटीएनएस ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीचा फेब्रुवारी २०२३ चा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यात पुणे पोलिसांना ३४२ पैकी केवळ १३० (३८ टक्के) असे सर्वात कमी गुण मिळाले आहेत. बीड पोलिसांनी मात्र ३४२ पैकी ३३५ गुण (९८ टक्के) मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. दुसरीकडे पुणे पोलिसांच्या थोडेसे पुढे पुणे ग्रामीण पोलिस असून, त्यांना ३४२ पैकी १४७ गुण (४३ टक्के) मिळाले आहेत.
गेल्या वर्षी राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाने घेतलेल्या सर्वोत्कृष्ट पोलीस घटक स्पर्धेत पुणे पोलीस दलास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. उत्कृष्ट कार्यपद्धती, गुन्हेगारी प्रतिबंध, गुन्ह्यांचा त्वरित तपास आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना प्रोत्साहित करण्यासाठीच्या योजना, अशा निकषांमध्ये पुणे पोलिस अव्वल ठरले होते.
काय आहे सीसीटीएनएस प्रणाली?
देशभरातील गुन्ह्यांची तसेच गुन्हेगारांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, यासाठी ही यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. त्यात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर), गुन्हेगारांची माहिती ऑनलाइन नोंदविली जाते. या यंत्रणेला सीसीटीएनएस प्रणाली म्हणून ओळखले जाते. या प्रणालीमुळे कोणत्याही पोलिसांना देशभरातील गुन्हेगारांची माहिती उपलब्ध होऊ शकते.
७ प्रकारची माहिती भरणे आवश्यक
सीसीटीएनएस प्रणालीमध्ये ७ प्रकारची माहिती भरणे आवश्यक असते. त्यात प्रथम एफआयआर, गुन्ह्यांचा तपशील, गुन्हेगारांची अटक, मालमत्ता तपासणी, मुद्देमाल जप्त, हत्यार जप्ती, कोर्ट निर्णय याची माहिती या प्रणालीवर नोंदविली गेली पाहिजे. याशिवाय बेपत्ता व्यक्ती, मयत अनोळखी व्यक्तींची नोंद, गुन्हेगारी टोळ्या, त्यांचे सदस्य अशा विविध गुन्हेगारांशी संबंधित माहिती या प्रणालीवर भरणे आवश्यक असते.
पुणे पोलिस आयुक्तालयाच्या ३३ पोलिस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आलेल्या सर्व गुन्ह्यांची नोंद सीसीटीएनएसवर करणे आवश्यक असते. यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यातील ५ ते ६ जणांना याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. अनेकदा बंदोबस्त, शनिवार, रविवार सुट्या यामुळे अनेक पोलिस ठाण्यांमधील गुन्हे तसेच इतर बाबींची सीसीटीएनएसवर नोंद होताना दिसत नाही. त्याचा परिणाम महिन्याच्या प्रगती पुस्तकावर दिसून येतो. सध्याच्या पेंडन्सीमुळे पुणे पोलिसांचा क्रमांक तळाला गेला आहे.
पुणे ग्रामीणही मागेच
पुणे पोलिस आयुक्तालयापाठोपाठ पुणे ग्रामीण पोलिस दलही यामध्ये खूप मागे आहे. विशेष म्हणजे डिसेबर २०२१ मध्ये पुणे पोलिस आयुक्तालयाला ७४ टक्के गुण मिळाले होते. त्याचप्रमाणे पुणे ग्रामीण पोलिस दलाला ८४ टक्के गुण मिळाले होते. त्यानंतर आता पुणे ग्रामीणची ४४ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे.