गणेश विसर्जन सोहळ्यानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी 'हे' ट्विट करून मानले पुणेकरांचे आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 12:24 PM2020-09-02T12:24:35+5:302020-09-02T12:30:55+5:30
दरवर्षी पुण्यातील गणेश विसर्जन सोहळा जवळपास २४ ते ३० तासांपर्यंत सुरू असतो..
पुणे : दरवर्षी पुण्यातील गणेश विसर्जन सोहळा जवळपास २४ ते ३० तासांपर्यंत सुरू असतो. यात आकर्षक स्वरुपाचे देखावे, डीजे, बँड ,ढोल ताशा यांचा लवाजमा हे सारे सोबतीला असते. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील संपूर्ण गणेशोत्सवासोबतच विसर्जन सोहळा देखील अगदी साधेपणाने साजरा करण्यात आला. यामुळेच पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के.वेंकटेशम यांनी पुणकरांचे ट्विटर वर आपल्या भावना व्यक्त करून आभार मानले आहे.
डॉ. वेंकटेशम यांनी " कसलाही भपका नाही.. मोठमोठ्या मूर्ती नाहीत.. मिरवणूक नाही सारं कसं साधेपणानं... शिस्तीत आणि पर्यावरणाची पुरेपूर काळजी घेऊनच.. पुढल्या वर्षीही गणेशोत्सव प्रचंड उत्साहानं,पण अशाच शिस्तीनं, इकोफ्रेंडली पद्धतीनं साजरा होऊ दे..."अशा शब्दात ट्विट करून पुणेकरांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या.
पुण्यातील गणेश विसर्जन सोहळ्याला तशी फार प्रदीर्घ परंपरा आहे. हा सोहळा पाहण्यासाठी देश विदेशातून लोक पुण्यात येतात. येथील विसर्जन सोहळ्यातील आकर्षक सजावट केलेल्या मिरवणुका, ढोल ताशांचे जल्लोष पूर्ण उत्साहात होणारे वादन, डीजेच्या तालावर एक दिवसांच्या वर चालणारा हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. मात्र या कालावधीत पर्यावरणाची देखील मोठी हानी होते. तसेच नागरिकांच्या आरोग्यही धोक्यात येते. तसेच पोलीस यंत्रणेवर देखील प्रचंड ताण येत असतो. पण यंदा कोरोनामुळे सर्वत्रच गणेशोत्सवावर मर्यादा आल्या तशा पुण्यात सुद्धा होत्या. त्यामुळे अगदी साधेपणाने गणेशाची मनोभावे सेवा करून ना मोठे देखावे, ना मंडप, ना मिरवणूका असे सर्वकाही दरवर्षीचा थाटमाट बाजूला ठेवत अगदी साधेपणाने व वेळेत गणेश विसर्जन सोहळा संपन्न झाला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने कसबा गणपतीचे सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी मंडपातच विसर्जन करण्यात आले.
मानाचा दुसरा गणपती असलेल्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी करण्यात आले.
तिसरा मानाचा गणपती म्हणून नावलौकिक असलेल्या गुरुजी तालीम मंडळाने मोजक्याच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत 'श्रीं'ची आरती करून दुपारी एक वाजता गणरायाचे विसर्जन करत निरोप दिला.त्यानंतर दुपारी १ वाजून दहा मिनिटांनी मानाच्या गणपतींपैकी एक असलेल्या तुळशीबाग गणपतीचा विसर्जन सोहळा पार पडला. मानाचा पाचवा गणपती असलेल्या केसरीवाडा येथील 'श्रीं 'चे विसर्जन दुपारी १ वाजून ३५ मिनिटांनी करण्यात आले.
त्यामुळे डॉ. के. वेंकटेशम यांनी पुण्याच्या नागरिकांचे प्रशासनाला केलेल्या सहकार्याबद्दल ट्विट करून आभार केले आहे..