"गज्या मारणे टोळीला आश्रय देणाऱ्यांवरही मोक्का लागणार"; पुण्याच्या पोलीस आयुक्तांचा इशारा
By विवेक भुसे | Published: October 12, 2022 03:56 PM2022-10-12T15:56:56+5:302022-10-12T16:08:53+5:30
पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा इशारा...
पुणे : शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतविलेल्या ४ कोटी रुपयांच्या बदल्यात २० कोटी रुपयांची मागणी करुन व्यावसायिकाचे अपहरण करणाऱ्या कुख्यात गुंड गज्या मारणे टोळीतील १४ जणांवर पुणे पोलिसांनी माेक्का कारवाई केली आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून गज्या मारणे व त्याचे साथीदार फरार झाले आहेत. त्यामुळे या गुंडांना आश्रय देणारे, सहाय्य करणारे, आर्थिक मदत करणारे कोणी आढळून आल्यास त्यांच्यावरही मोक्का कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला आहे.
मुळचे सांगलीचे असणारे व सिंहगड रोडवर राहणारे फिर्यादी यांचा रिअल इस्टेट व शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. सांगलीच्या हेमंत पाटील याने त्यांच्याकडे ४ कोटी रुपये गुंतवणूकीसाठी दिले होते. शेअर मार्केटमध्ये तोटा झाल्याने ते पैसे देऊ शकत नव्हते. तेव्हा हेमंत पाटील व गज्या मारणे टोळीने त्यांचे अपहरण करुन त्यांना मारहाण करुन ४ कोटी रुपयांचे आता २० कोटी रुपये देण्याची मागणी केली होती. याचा खंडणी विरोधी पथकाने गुन्हा दाखल करुन त्यातील चौघांना अटक केली आहे. गुन्हा दाखल होत असल्याचे समजल्यावर गज्या मारणे व त्याचे साथीदार फरार झाले आहेत. या १४ जणांच्या टोळीवर पोलिसांनी मोक्का कारवाई केली आहे.
तळोजा कारागृहातून सुटल्यावर गज्या मारणे याची त्याच्या टोळीने मुंबई -पुणे महामार्गावर रॅली काढून दहशत माजविली होती. त्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. तेव्हा गज्या मारणे हा फरार झाला होता. तेव्हा पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याला सातारा येथून अटक केली होती. त्यानंतर त्याला वर्षभर स्थानबद्ध केले होते. मार्च महिन्यात तो कारागृहातून बाहेर आला होता. त्यानंतरही त्याची गुन्हेगारी कायम असल्याचे आढळून आले. सध्या तो फरार आहे. त्याला इतर कोणाची मदत मिळू नये व त्याच्या नाड्या आवळता याव्या, यासाठी त्याला मदत करणार्यांवरही मोक्का कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.