खाकी वर्दीआड दडलेला अलवार आवाज सोशल मीडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 05:58 PM2020-01-02T17:58:28+5:302020-01-02T18:02:34+5:30
सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात कोणतीही गोष्ट क्षणात व्हायरल होऊ शकते. आणि पोस्टमुळे ती व्यक्तीही जगभर प्रसिद्ध होते. हाच अनुभव पुणे पोलीस दलातील कॉन्स्टेबल सागर घोरपडे घेत आहेत.
पुणे :सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात कोणतीही गोष्ट क्षणात व्हायरल होऊ शकते. आणि पोस्टमुळे ती व्यक्तीही जगभर प्रसिद्ध होते. हाच अनुभव पुणे पोलीस दलातील कॉन्स्टेबल सागर घोरपडे घेत आहेत. त्यांनी गायलेले गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून महाराष्ट्रातूनच नाही तर जगभरातून त्यांना फोन येत आहेत.
सागर उर्फ विठ्ठल घोरपडे हे मूळ सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रहिवासी. २०१२साली ते पोलीस दलात सामील झाले. गाण्याची आवडही त्यांना लहानपणापासून होती. मात्र संगीताचे शास्त्रीय शिक्षण घेण्याचा योग आलेला नाही. गावी भजनी मंडळात ते साथीला गायचे. त्यांचा आवाज ऐकून इतर गावातले लोकही त्यांना गायला बोलवायचे. पुढे नोकरी सुरु झाली आणि गाणे मागेच राहिले.
पण काही दिवसांपूर्वी त्यांच्या मित्राने एक नव्या गाणे आणि संगीताचा ट्रॅक पाठवला आणि गाण्याचा आग्रह केला. सुरुवातीला त्यांनाही जमेल की नाही अशी शंका होती. पण त्यांनी सराव केला आणि ते गाणे रेकॉर्ड करून फेसबुकवर अपलोड केले. २७ डिसेंबरला अपलोड केलेले ते गाणे काही तासात व्हायरल झाले. अनेक फेसबुक पेज आणि युजर्सने ते शेअर केले. खाकी वर्दीच्या मागे दडलेल्या या अलवार आवाजाला अनेकांनी स्टेस्टसवर स्थान दिले. त्यांना अगदी दुबई, दक्षिण आफ्रीकेतूनही चाहत्यांचे फोन आले. पुण्यातल्याच नाही तर महाराष्ट्राल्या अनेक पोलीसांच्या ग्रुपवर व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या अनुभवाबद्दल लोकमतशी बोलताना ते म्हणाले की,' सुरुवातीला माझा आवाज लोकांना इतका आवडेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. आता मिळणारा प्रतिसाद बघून मन भरून आलंय. आता कामासोबत गाणेही वाढवण्याचा विचार आहे. कला अनेकदा साद घालत होती पण तेव्हा वेळ देता आला नाही, आता मात्र मी गाण्याचे शिक्षण घेऊन त्याचा उपयोग सामाजिक कामासाठीही करण्याचा विचार करतो आहे'.
अनेकदा चित्रपटातून, पुस्तकांमधून पोलिसांचे कठोर, रुक्ष असे चित्र रंगवले जाते. गुन्हेगार किंवा वाईट प्रवृत्तींवर जरब ठेवण्यासाठी त्यांना तसे वागावेही लागते. पण त्यांच्यातही संवेदनशील, हळवा आणि कलाकार मनाचा माणूस असतो. तो प्रत्येकाला दिसतोच असेही नाही, पण म्हणून पोलिसांवर असा शिक्का मारणेही योग्य नाही. पोलिसांची ही प्रतिमा बदलण्याचाही यामागे उद्देश असल्याचे घोरपडे यांनी सांगितले.