Pune Police: पुणे पोलीस दलातील 232 पोलीस कर्मचारी 'कोरोना पॉझिटिव्ह'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 04:21 PM2022-01-10T16:21:30+5:302022-01-10T16:24:36+5:30
पोलीस दलातील एवढे कर्मचारी अचानक बाधित झाल्याने पोलिसांबरोबरच नागरिकात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुणे : देशात आज लाखांच्या घरात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर राज्यातही रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. सध्या मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी हा विषाणू अधिक वेगाने पसरू लागला आहे. राज्यात मुंबईपाठोपाठ पुण्यातही कोरोनाचे रुग्ण दुपटीने वाढू लागले आहेत. त्यातच एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. पुणे शहरातल्या पोलीस दलातील तब्बल २३२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पोलीस दलातील एवढे कर्मचारी बाधित झाल्याने पोलिसांबरोबरच नागरिकात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यात कोरोनाची आकडेवारी वाढत चालली आहे, पोलीस बांधवांना ही कोरोनाची लागण होत असल्याने सुरक्षा व्यवस्थेसमोर अनेक सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. मुंबईत बहुसंख्य पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यापाठोपाठ पुण्यात ही गेल्या ८ दिवसात केलेल्या कोरोना चाचणीत पुण्यातील साधारण २३२ पोलीस कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत. 31 डिसेंबर रोजी नवीन वर्षाचे स्वागत आणि 1 जानेवारी रोजी पुण्यातील कोरेगाव भीमा येथे झालेला शौर्यदिनाचा कार्यक्रम या दोन्ही वेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. पुणे पोलीस आयुक्तालयांतर्गत जवळपास सर्वच पोलिसांची अँटिजेन कोरोना चाचणी करण्यात आली. यात 202 कर्मचारी आणि 30 पोलीस अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
शहरात काल ४ हजाराहून अधिक रुग्ण
शहरात रविवारी रुग्णसंख्येचा उद्रेक पहायला मिळाला. रविवारी शहरात १८ हजार ०१२ चाचण्या झाल्या. त्यापैकी ४०२९ कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. शहराचा पॉझिटिव्हीटी रेट २२ टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णसंख्या १४ हजार ८९० इतकी झाली आहे.
नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झपाट्याने वाढत आहे. एका दिवसात तबबल १५०० रुग्णांची वाढ झाली. रुग्णसंख्या कितीतरी पटींनी वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्याचवेळी बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९५.४३ टक्के आहे. नागरिकांनी मास्कचा वापर, सोशल डिस्टनसिंग आणि सॅनिटायरझरचा वापर करावा, असे आवाहन केले जात आहे.
तिसऱ्या आठवड्यापर्यंत रुग्णसंख्येचा उच्चांक गाठण्याची शक्यता
शहरात ८ महिन्यांनी रुग्णसंख्येने ४००० चा टप्पा ओलांडला आहे. यापूर्वी २ मे रोजी शहरात ४०४४ इतक्या कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले होते. त्यावेळी १६ हजार ६१० कोरोना चाचण्या झाल्या होत्या. सक्रिय रुग्णसंख्या ४२ हजार २२९ इतकी होती. जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत तिसऱ्या लाटेतील रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शहराचा पॉझिटिव्हीटी रेट २८ ते ३० टक्क्यांवर पोहोचेल आणि त्यानंतर साथ ओसरू लागेल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.