कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांचा रांचीत फादर स्टेन स्वामीच्या घरावर छापा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 11:40 AM2019-06-12T11:40:11+5:302019-06-12T11:47:49+5:30
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी झारखंड राज्यातील रांची येथे पुणे पोलिसांनी बुधवारी सकाळी फादर स्टेन स्वामी याच्या घरी छापा टाकला आहे.
पुणे : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी झारखंड राज्यातील रांची येथे पुणेपोलिसांनी बुधवारी (12 जून) सकाळी फादर स्टेन स्वामी याच्या घरी छापा टाकला आहे. तसेच तपास सुरू केला असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिली आहे. पोलिसांनी डिजिटल डिव्हाईस व इतर काही साहित्य हस्तगत केल्याचे सांगण्यात येत आहे.
शनिवारवाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेत बंदी असलेल्या माओवाद्यांचा समावेश असल्याच्या कारणावरुन पुणे पोलिसांनी यापूर्वी पाच माओ समर्थकांना अटक केली होती. त्यावेळीही रांचीमधील फादर स्टेन याच्या घरी पुणे पोलिसांनी छापा टाकला होता. त्यामुळेही स्वामी यांची घरी चौकशी केली होती. मात्र त्यावेळी त्यांना अटक केली नव्हती.
Pune police have conducted search at the residence of Stan Swamy in Jharkhand and recovered some material including electronic devices in connection with Elgaar Parishad (Bhima Koregaon) case.
— ANI (@ANI) June 12, 2019
बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन पुणे पोलिसांनी पाच विचारवंतांना यापूर्वीच अटक केली आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुणे पोलिसांनी आज सकाळी रांची येथील स्टेन यांच्या घरी छापा घातला आहे. याबाबत पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी सांगितले की, पुणे पोलिसांनी स्टेन च्या घरावर छापा घातला असून सर्च मोहिम हाती घेतली आहे. या सर्च मोहिमेत काही पुरावा हाती लागला आहे का याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
फादर स्टेन स्वामी हे मुळचे केरळचे रहिवासी असून ते गेल्या 50 वर्षांपासून झारखंडमध्ये चाईबासा येथे राहून आदिवासी संघटनांसाठी काम केले आहे. 2004 मध्ये झारखंडची निर्मिती झाल्यानंतर ते रांची येथे आले. त्यांनी ‘नामकुंम बगेईचा’ या आदिवासींच्या अधिकारासाठी काम करणाऱ्या संघटनेत काम केले. सध्या ते नक्षकवादाचा ठपका ठेवून तुरुंगात टाकण्यात आलेल्या आदिवासी कैद्यांसाठी ते काम करत आहे.