पुणे पोलीस इंडिया सायबर कॉप; यूपीआय अॅप घोटाळ्याचा तपास वैशिष्ट्यपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 05:36 AM2017-12-17T05:36:49+5:302017-12-17T05:36:54+5:30
सायबर गुन्ह्यांच्या तपासात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दलचा इंडिया सायबर कॉप पुरस्कार पुणे पोलीस दलातील सायबर सेलला देण्यात आला. पुणे पोलिसांनी सायबर गुन्ह्यामधील राज्यभरातील ११ गुन्हे उघडकीस आले.
पुणे : सायबर गुन्ह्यांच्या तपासात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दलचा इंडिया सायबर कॉप पुरस्कार पुणे पोलीस दलातील सायबर सेलला देण्यात आला. पुणे पोलिसांनी सायबर गुन्ह्यामधील राज्यभरातील ११ गुन्हे उघडकीस आले आणि १८ गुन्हेगार जेरबंद केले़ तसेच पुणे शहरात दाखल झालेल्या यूपीआय अॅप घोटाळ्यातील ६ कोटी रुपयांची रोकड जप्त केली. या गुन्ह्यांचा चार महिने अविरत तपास करून गुन्हेगारांना अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आले. या गुन्ह्यांचा वैशिष्ट्यपूर्ण तपास लावल्याबद्दल नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात पुणे पोलिसांना विनरअप ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
पुणे पोलीस दलात कार्यरत असताना वरिष्ठ निरीक्षक सुनील पवार यांनी यूपीआय अॅपच्या माध्यमातून होणारा आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आणला होता. या पुरस्कारासाठी देशभरातून २२६ प्रवेशिका आल्या होत्या. त्यातील तीन प्रवेशिकांची निवडून त्या जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये केरळ, कोलकाता आणि पुणे पोलिसांचा समावेश होता.
या तीन यंत्रणांच्या तपासातून एकाची निवड होणार होती. त्यानुसार पहिले पारितोषिक केरळ पोलिसांना जाहीर झाले तर पुणे पोलिसांना विनरअप ट्रॉफी मिळाली.