Pune: मिरवणुकीला विलंब हाेण्यास पुणे पाेलिसच जबाबदार, मंडळांच्या कार्यकर्त्यांचा आराेप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 03:44 PM2023-09-30T15:44:35+5:302023-09-30T15:45:19+5:30
परवानगी न दिल्याने थांबावे लागले ताटकळत...
पुणे : दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ यंदा विसर्जन मिरवणुकीत दुपारी चार वाजताच सहभागी झाले. त्यानंतर अन्य महत्त्वाच्या मंडळांनी मिरवणुकीत सामील होण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी परवानगी न दिल्याने त्यांना सहभागी होता आले नाही. परिणामी मिरवणूक लांबत गेली. महत्त्वाची मंडळे लवकर सहभागी झाली असती तर मिरवणूक लवकर संपली असती, असा दावा मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत लवकर सामील झाल्यामुळे यंदाची विसर्जन मिरवणूक गेल्यावर्षीच्या तुलनेत किमान पाच ते सहा तास लवकर संपेल, अशी अपेक्षा होती; मात्र त्यानंतर मिरवणुकीत सामील होणाऱ्या महत्त्वाच्या मंडळांना बेलबाग चौकात येण्यास तब्बल सहा तासांचा विलंब झाला आणि अपेक्षेवरच पाणी फिरले.
दरवर्षीच्या विसर्जन मिरवणुकीत जिलब्या मारुती मंडळ त्यानंतर बेलबाग मित्रमंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मित्रमंडळ, अखिल मंडई मंडळ या मंडळानंतर दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ सहभागी होत असे. त्यामुळे दगडूशेठ हलवाई मंडळाच्या गणपतीला विसर्जनासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी ११ पर्यंतचा वेळ लागत होता. त्यामुळे दगडूशेठ मंडळानंतर सहभागी होणाऱ्या मंडळांना अनेक तास रांगेतच थांबावे लागत होते.
दरम्यान, जिलब्या मारुती मंडळ दुपारी पाच वाजल्यापासून मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी तयार होते. बेलबाग मित्रमंडळाचा रथही तयार होता. भाऊ रंगारी मित्रमंडळाने रथ बाबू गेनू चौकात आणून ठेवला होता. या चार मंडळांमध्ये शेवटचा असलेला अखिल मंडई मित्रमंडळाचा रथ सुमारे साडेसात वाजता मंडपातून मार्गस्थ झाला. पुढील तासाभरात आम्ही मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी विभाग चौकात दाखल होऊ, असा आशावाद मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी बोलून दाखवला. मात्र, मिरवणुकीत सहभागी होण्यापूर्वीच दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या जागेवर मुठेश्वर मित्रमंडळ व वीर हनुमान मित्रमंडळ दाखल झाले होते. त्यामुळे या मागील मंडळांना चौकात येण्यास अडथळा निर्माण झाला. तरीदेखील लक्ष्मी रस्त्यावरील मंडळांना थांबवून शिवाजी रस्त्यावरील मंडळांना अर्थात या चार महत्त्वाच्या मंडळांना बेलबाग चौकात येण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती सर्वच मंडळांनी केली हाेती. मिरवणुकीत लवकर सहभागी झाल्यात पुढील तीन तासांत आम्ही मिरवणूक विसर्जन संपवू, असे आश्वासन थोरात यांनी पोलिसांना दिले हाेते.
लक्ष्मी रस्त्यावरून येणाऱ्या मंडळांना थांबवावे लागेल, या कारणासाठी या महत्त्वाच्या मंडळांना बेलबाग चौकात येऊ दिले जात नव्हते. अखेर पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी तोडगा काढत शिवाजी रस्त्यावरील मंडळांना थांबविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पावणेदहा वाजता मुठेश्वर मित्रमंडळ बेलबाग चौकात दाखल झाले. हे मंडळ तब्बल एक तास याच ठिकाणी रेंगाळले होते. जिलब्या मारुती मंडळ दहा वाजून पन्नास मिनिटांनी बेलबाग चौकात दाखल झाले. या मंडळाने देखील सुमारे ३५ मिनिटे वादन केल्यानंतर बाबू गेनू मित्रमंडळाला चौक मोकळा करून दिला. केवळ दहा मिनिटे वादन करण्याचे आश्वासन देऊनही या दोन मंडळांनी सुमारे दीड तास विलंब लावला. परिणामी पुढील मंडळांना चौकात येण्यास उशीर झाला.
मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी आमचे मंडळ साडेसात वाजल्यापासून तयार होते; मात्र पोलिसांनी परवानगी दिली नाही. परिणामी पहाटे तीन वाजता मंडळ बेलबाग चौकात आले. लवकर परवानगी मिळाली असती तर विसर्जन लवकर संपविता आली असती.
- अण्णा थोरात, अध्यक्ष, अखिल मंडई मित्रमंडळ