Pune Police: पुण्यात पोलीस ठाणे मिळेना, गुन्हेगारी थांबेना; पालकमंत्री लक्ष देणार कधी?
By विवेक भुसे | Published: January 8, 2024 10:35 AM2024-01-08T10:35:33+5:302024-01-08T10:40:01+5:30
प्रस्ताव दोन वर्षभरापासून गृह खात्याकडे पडून; पालकमंत्री लक्ष देणार कधी?...
पुणे : वर्षभरात सर्वसाधारणपणे २५० हून अधिक गुन्हे दाखल होणाऱ्या पोलिस ठाण्यांना जादा मनुष्यबळ देण्याचा, तसेच नवीन पोलिस ठाणे निर्मितीचा प्रस्ताव गेल्या दोन वर्षभरापासून गृह खात्याकडे पडून आहे. वाढती लोकसंख्या आणि गुन्ह्यांचे प्रमाण लक्षात घेऊन पुणे शहर पोलिस आयुक्तालयात ७ नवीन पोलिस ठाणे निर्मितीचा सदर प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविला होता. त्यावर पुढे काहीच कारवाई झाली नाही.
दरम्यान, हडपसर पोलिस ठाण्यात २०२३ मध्ये तब्बल १९६७ गुन्हे दाखल झाले. कोंढवा पोलिस ठाण्यात १३२० गुन्हे आणि लोणीकंद पोलिस ठाण्यात १०२९ गुन्हे दाखल झाले आहेत. आता तरी शासनाकडून नवीन पोलिस ठाण्यांच्या प्रस्तावावर कारवाई केली जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्याचे मोठ्या प्रमाणावर नागरीकरण होत असतानाच गुन्हेगारी देखील वाढत आहे. त्याला रोखण्यासाठी पोलिस यंत्रणा कमी पडत आहे. शासनाने पोलिस आयुक्तालयातील पोलिस ठाणे व जिल्हा स्तरावरील पोलिस ठाणे यांना मनुष्यबळासाठी नवीन निकष निश्चित केले आहेत. त्यानुसार पोलिस आयुक्तालयात ४ पोलिस निरीक्षक असणार असून, त्यात २ गुन्हे आणि एक सायबर असे विभाजन असणार आहे. त्याचबरोबर नवीन पोलिस ठाण्यांचा प्रस्ताव देखील प्रलंबित आहे.
मविआत निर्णय; महायुतीत प्रस्ताव बस्त्यात :
महाविकास आघाडी सरकार असताना पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे शहरात ७ नवीन पोलिस ठाण्यांना मंजुरी दिली होती. त्यात हडपसर आणि कोंढवा पोलिस ठाण्यातून एकूण ३ नवीन पोलिस ठाण्यांचा प्रस्ताव होता. तसेच चतु:शृंगी पोलिस ठाण्यातून नवीन बाणेर पोलिस ठाण्याचा प्रस्ताव होता. तत्कालीन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या पोलिस ठाण्यांसाठीची जागा देखील निश्चित केली होती. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार गडगडले आणि हे प्रस्ताव थंड बस्त्यात गेले. पालकमंत्रिपदाचा कार्यभार पुन्हा अजित पवार यांच्याकडे आला आहे. त्यामुळे आताही या प्रस्तावांना चालना मिळणार का? अशी विचारणा केली जात आहे.
एकेका अधिकाऱ्याकडे २५ ते ३० गुन्हे :
हडपसर पोलिस ठाण्यात सध्या वरिष्ठ निरीक्षकांसह ३ पोलिस निरीक्षक, २२ पोलिस अधिकारी, १६५ पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत. ही संख्या जवळपास २५० गुन्हे असणाऱ्या पोलिस ठाण्यासाठी पुरेशी असते. नव्या निकषाप्रमाणे चार निरीक्षक, १९ पोलिस अधिकारी आणि १६६ पोलिस कर्मचारी असा प्रस्ताव आहे. हा निकष पाहता हडपसर पोलिस ठाण्यात ८ पट गुन्हे दाखल होत आहेत. मनुष्यबळ मात्र आहे तेवढेच आहे. तीन निरीक्षक, १८ पोलिस अधिकारी, १४० पोलिस कर्मचारी यांच्या बळावर संवेदनशील, अशा कोंढवा पोलिस ठाण्याचा कारभार चालविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे एकेका अधिकाऱ्याकडे २५ ते ३० गुन्हे तपासासाठी असतात. त्यात मोर्चा, मिरवणुका, व्हीआयपींच्या दौऱ्यांचा बंदोबस्त अशा सर्व बाबी हाताळाव्या लागतात.
सर्वात कमी गुन्हे असलेले पोलिस ठाणे :
- गेल्या वर्षभरात कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात २०१ गुन्हे, अलंकार पोलिस ठाणे २०३ गुन्हे, डेक्कन २१८, तर उत्तमनगरमध्ये १३७ गुन्हे दाखल आहेत. या पोलिस ठाण्यातही मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे.
- अलंकार पोलिस ठाण्यासारख्या छोट्या पोलिस ठाण्यात २ पोलिस निरीक्षक, ८ पोलिस अधिकारी आणि ५० पोलिस कर्मचाऱ्यांच्या बळावर कारभार करावा लागतो आहे. त्यात कार्यालयीन काम, संगणक कक्ष, महिला मदत कक्ष, बिनतारी संदेश यंत्रणा, अभिलेख, मुद्देमाल कारकून, हजेरी कारकून, हरविलेल्यांचा शोध, न्यायालय पैरवी, टपाल वाहक अशा वेगवेगळ्या कामांसाठी दिवस व रात्रपाळीसाठी कर्मचारी वर्ग लागत असतो.
- याशिवाय साप्ताहिक सुटी, आजारपण, गैरहजेरी अशांसाठी १० टक्के कर्मचारी वर्ग राखीव ठेवावा लागतो. त्यामुळे गुन्हे कमी असले तरी छोट्या पोलिस ठाण्यांनाही मनुष्यबळाची कमतरता जाणवत असते.
हद्दीची पुनर्रचनाही रेंगाळली :
पुणे शहर पोलिस आयुक्तालयातून ८ वर्षांपूर्वी नवीन पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी पोलिस ठाण्यांच्या हद्दीची पुनर्रचना करण्याचे निश्चित केले होते. परंतु, त्या संबंधीचे प्रस्ताव अजूनही पडून आहेत. काही पोलिस ठाण्यांची हद्द अतिशय छोटी, तर काही पोलिस ठाण्यांची हद्द १५ ते २० किलोमीटर इतकी आहे. हिंजवडी पोलिस ठाण्याची हद्द चांदणी चौकापासून सुरू होते. मुंबई-बंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकाच्या उत्तर दिशेला काही घटना घडली तर थेट १५ किमीवरील हिंजवडीतून पोलिसांना तेथे जावे लागते. अशीच परिस्थिती लोणीकंद, हडपसर पोलिस ठाण्यांची आहे. त्यामुळे मनुष्यबळ, नवीन पोलिस ठाण्यांच्या निर्मितीबरोबरच हद्दीच्या पुनर्रचना तातडीने होण्याची आवश्यकता आहे.