Pune: सदाशिव पेठेत झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात १०० मार्शल अन् २०० पोलिसांची गस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 10:32 AM2023-06-28T10:32:35+5:302023-06-28T10:35:01+5:30
मंगळवारी सकाळी सदाशिव पेठेत झालेल्या मुलीवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाने दुपारी पोलिस आयुक्तांची भेट घेत निवेदन दिले....
पुणे : शहरात लगेचच १०० मार्शल आणि २०० पोलिसांची गस्त सुरू करण्याचे आश्वासन पोलिस आयुक्तांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिले. मंगळवारी सकाळी सदाशिव पेठेत झालेल्या मुलीवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाने दुपारी पोलिस आयुक्तांची भेट घेत निवेदन दिले. त्यात त्यांनी शहराच्या काही वस्त्यांमध्ये पोलिसांची गस्त सुरू करण्याची मागणी केली.
आमदार रवींद्र धंगेकर, माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी व संजय बालगुडे, प्रशांत सुरसे, रमेश अय्यर, नुरुद्दीन सोमजी, चेतन अग्रवाल, प्रथमेश आबनावे यांचा शिष्टमंडळात समावेश होता. पुण्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळत चालली असल्याची चिंता शिष्टमंडळाने व्यक्त केली.
धंगेकर यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे शहरात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. पुण्यात शिक्षणासाठी म्हणून आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ४ लाखांपेक्षाही जास्त आहे. त्यांच्यात आता भीती निर्माण झाली आहे.
पोलिसांचा वचक राहिलेला नाही. पूर्वी पोलिसांची गस्त होत असे, ती आता होत नाही. मध्यवस्ती, झोपडपट्टी येथे पोलिसांची गस्त सातत्याने व्हायला हवी, तर तिथेच अनेक अवैध धंदे सुरू असतात. तक्रार आली की त्याची पोलिसांकडून दखल घेतली जात नाही. वेळीच दखल घेतली गेली तर अशा घटना टाळणे शक्य आहे, असे शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तांना सांगितले. त्यानंतर आयुक्तांनी लगेचच अशी गस्त सुरू करण्याचे आदेश पोलिस अधिकाऱ्यांना दिले.