माओवाद्यांशी 'कनेक्शन' असणाऱ्यांवर पुणे पोलिसांची 'अॅक्शन'; देशभरात 'सर्च ऑपरेशन'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 11:41 AM2018-08-28T11:41:18+5:302018-08-28T13:51:44+5:30
बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुणे पोलिसांनी मंगळवारी हैदराबाद, मुंबई, दिल्ली, छत्तीसगड येथे छापे घालून सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.
पुणे : बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुणेपोलिसांनी मंगळवारी (28 ऑगस्ट) पहाटे हैदराबाद, मुंबई, दिल्ली, छत्तीसगड येथे छापे घालून सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. यामध्ये वरावरा राव (हैदराबाद), वेरनोन गोन्सालविस, अरुण पाररिया (मुंबई), सुधा भारद्वाज (छत्तीसगड), गौतम नवलाखा यांच्या घरावर छापे टाकून झडती घेतली जात आहे. याबाबत सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी देशातील विविध शहरांमध्ये पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे त्याची माहिती अद्याप आलेली नसल्याचं सांगितलं.
पुण्यातील शनिवारवाडा येथे 31 डिसेंबर 2017 रोजी आयोजित केलेल्या एल्गार परिषदेत माओवाद्यांनी पैसे पुरविल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. या प्रकरणी पुणे पोलिसांनी यापूर्वी परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे, अॅड. सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, रॉनी विल्सन आणि प्रा. शोमा सेन यांना अटक केली होती. त्यांच्याकडे सापडलेल्या 200 ई-मेलमध्ये या पाच जणांचा बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी त्यानंतर हैदराबाद, मुंबई, दिल्ली तसेच छत्तीसगडमध्ये या माओवादीचे थिंक टॅक असलेल्यांची माहिती घेतली. ते त्यांच्या घरी असल्याची माहिती झाल्यानंतर आज पहाटे एकाच वेळी किमान पाच ठिकाणी छापे घालून झडती घेण्याचे काम सुरु आहे. माओवाद्यांशी संबंध असल्याने व एल्गार परिषदेशी संबंधित असलेल्यांना यापूर्वी अटक केली असली तरी आता ज्यांच्या घराची झडती घेतली जात आहे, त्यांची एल्गार परिषद अथवा कोरेगाव भीमा दंगलीशी संबंध नसून ते बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी संबंधित असल्याचे उघड झाल्याने त्यांची चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते.