देवासारखे धावून आले! चेंबरमध्ये रात्रभर अडकलेल्या तरुणाचे पोलिसांनी वाचविले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 10:09 PM2022-04-14T22:09:55+5:302022-04-14T22:10:51+5:30
भंगार गोळा करताना रात्रीच्यावेळी अंधारात उघड्या चेंबरमध्ये पाय पडल्याने तो २५ ते ३० फुट खोल चेंबरमध्ये अडकला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: भंगार गोळा करताना रात्रीच्यावेळी अंधारात उघड्या चेंबरमध्ये पाय पडल्याने तो २५ ते ३० फुट खोल चेंबरमध्ये अडकला. सर्वत्र काळोख, घाण वास, त्यात तो जवळपास कमरेइतका सांडपाण्यात अडकलेला अशा अवस्थेत तो संपूर्ण रात्रभर धावा करत होता. सकाळी बंदोबस्तावर असलेल्या दोघा पोलीस कर्मचार्यांना त्याचा क्षीण झालेला आवाज कानी पडला अन ते देवासारखे धावून गेले. त्यांनी तातडीने अग्निशमन दलाची मदत घेऊन त्याला शिडीच्या सहाय्याने बाहेर काढले. त्यानंतर त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले.
फरासखाना पोलीस ठाण्याचे कर्मचारी फिरोज बागवान आणि सचिन येनपुरे असे या पोलीस कर्मचार्यांची नावे आहेत. राजेंद्र नेगी असे या तरुणाचे नाव आहे. नेगी हा शहरात भंगार वेचण्याचे काम करतो. बुधवारी सांयकाळी नदीपात्र परिसरात तो भंगार वेचत होता. नदीपात्रानजीक एक मोठी पंपिंग टाकी असून टाकीला झाकण नसलेले एक मोठे चेंबर आहे. येथे रात्री बारा वाजण्याच्या सुमारास नेगी हा भंगारच्या शोधात गेला. मात्र, झाकण नसलेल्या चेंबरमध्ये त्याचा पाय पडल्याने तो थेट २० ते २५ फुट खोल चेंबरमध्ये पडला. प्रचंड अंधार आणि मोठी खोली यामुळे मनात भिती बसलेल्या नेगी याने मदतीसाठी मोठ्याने आवाज दिले. मात्र, रात्री बाराची वेळ असल्याने आवाज देऊनही त्याला मदत मिळू शकली नाही. टाकीत सांडपाणी असल्याने सुदैवाने नेगी याला मार लागला नाही. परंतु त्याला संपूर्ण रात्र त्याला कमरेइतक्या सांडपाण्याच्या चेंबरमध्येच काढावी लागली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी माहिती मिळताच घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच नेगी याला उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठविले.
पुणे: चेंबरमध्ये रात्रभर अडकलेल्या तरुणाचे पोलिसांनी वाचविला प्राण.#PunePolice#punenewshttps://t.co/CbvSFUBywhpic.twitter.com/5ksaDDbkUn
— Lokmat (@lokmat) April 14, 2022