गुंड गजा मारणेची आलिशान कार जप्त, पुणे पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 20:37 IST2025-02-28T20:35:18+5:302025-02-28T20:37:25+5:30
१९ फेब्रुवारी या दिवशी आरोपी गजा मारणे हा ३५ जणांसोबत छावा सिनेमा पाहण्यासाठी गेला होता. यावेळी यातील अनेक जण दुचाकी वर होते तर गजा मारणे हा फॉर्च्यूनर गाडीत होता

गुंड गजा मारणेची आलिशान कार जप्त, पुणे पोलिसांची कारवाई
किरण शिंदे
पुणे : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीय तरुणासोबत पंगा घेणे गुंड गजा मारणे याला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणात कोथरूड पोलिसांनी गुंड गजा मारणे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटकही केली आहे. गजा मारणे सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच्याकडे सुरू असलेल्या चौकशीतून नवीन माहिती समोर आली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणात गजा मारणेने गुन्हा घडला त्या दिवशी वापरण्यात आलेली आलिशान फॉर्च्यूनर गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे.
१९ फेब्रुवारी या दिवशी आरोपी गजा मारणे हा ३५ जणांसोबत छावा सिनेमा पाहण्यासाठी गेला होता. यावेळी यातील अनेक जण दुचाकी वर होते तर गजा मारणे हा फॉर्च्यूनर गाडीत होता. सिनेमा पाहून परत येत असताना कोथरूडच्या भेलकेनगर चौकात देवेंद्र जोग या तरुणासोबत गजा मारणे त्याच्यासोबत असलेल्या काही तरुणांचे भांडण झाले. आणि त्यानंतर आरोपींनी देवेंद्र जोग याला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर कमरपट्ट्याने देखील मारहाण केली. आणि हा संपूर्ण प्रकार सुरू असताना गजा मारणे स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होता आणि त्यानेच आरोपींना पीडित तरुणाला मारहाण करण्यासाठी उसकावल्याचे पोलिसांनी कोर्टात सांगितले होते. अधिक तपासासाठी गजा मारलेला तीन मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान गजा मारणे त्याच्यासोबत सिनेमा पाहण्यासाठी केलेले सर्वच जण पोलिसांच्या रडारवर आहेत. पोलिसांनी यापूर्वीच अटक केलेल्या आरोपींच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. तर आता त्या दिवशी गजा मारणे वापरत असलेली फॉर्च्यूनर गाडी देखील पोलिसांनी जप्त केली आहे. ही गाडी गजा मारणे याने दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर घेतली असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आठ ठिकाणचे सीसीटीव्ही ताब्यात घेतले आहे. आणि त्या माध्यमातून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
दरम्यान या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी गुंड गजा मारणेसह ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू (३५), किरण कोंडिबा पडवळ (३१) आणि अमोल विनायक तापकीर (३५, तिघे रा. शास्त्रीनगर, कोथरूड) या चौघांना अटक केली आहे. तर गजा मारणे याचा भाचा श्रीकांत ऊर्फ बाब्या संभाजी पवार, रुपेश मारणे हे दोघे पसार आहेत. मारहाण केल्याप्रकरणी देवेंद्र पुरुषोत्तम जोग (३३, रा. मयूर कॉलनी, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे.
गाडीचा धक्का लागल्यावरून मारहाण, काय आहे संपूर्ण प्रकरण
फिर्यादी देवेंद्र जोग हे आयटी अभियंता असून भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यांना मारहाण झाल्यावर कोथरूड पोलिसांनी सुरुवातीला मारहाणीची कलमे दाखल केली होती. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आल्यावर त्यामध्ये आरोपींविरोधात खुनाच्या प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्ह्याचे कलम वाढवण्यात आले. जोग हे १९ फेब्रुवारी रोजी घरी जाताना रस्त्यावर गर्दी असल्याने ते बाजूला थांबले होते. त्यावेळी गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून चौघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी, पट्ट्याने बेदम मारहाण केली. त्यामध्ये त्यांना जबर दुखापत झाली. त्याबाबत त्यांनी वडिलांसोबत कोथरूड पोलिस ठाण्यात जात फिर्याद नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींच्या मुसक्या आवळल्या.