घरच्यांची वाऱ्यावर सोडले पण पोलिसांनी ''आई'' मानले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 08:25 PM2019-08-08T20:25:59+5:302019-08-08T20:28:01+5:30
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्हर्चुअल नात्यांमध्ये रमणाऱ्या जगात सध्या खरी नाती मानणारी माणसेही आहेत. याचेच उदाहरण पुण्यात बघायला मिळाले.
पुणे : तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्हर्चुअल नात्यांमध्ये रमणाऱ्या जगात सध्या खरी नाती मानणारी माणसेही आहेत. याचेच उदाहरण पुण्यात बघायला मिळाले असून शहरातील दत्तवाडी पोलिसांनी कुटुंबाने वाऱ्यावर सोडलेल्या वयस्कर महिलेची तीन दिवस आईसारखी काळजी घेतल्याचे अनोखे उदाहरण बघायला मिळाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोनाबाई भोसले या ६५ वर्षाच्या महिला तीन दिवसांपूर्वी दांडेकर पुलाजवळ स्वतःचा पत्ता विसरला म्हणून भटकत होत्या. त्यांना स्थानिक नागरिकांनी दत्तवाडी पोलीस स्टेशनला आणून सोडले.पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांना स्वतःच्या घराचा पत्ता सांगता येत नव्हता. त्यांच्याकडून काही वेळाने मुलाचा फोन नंबर मिळवून, त्याला फोन केला. त्यावेळी त्यांच्या सुनेने फोन उचलला. त्यावेळी तिने सासू आमच्यासोबत नव्हे तर वारजे भागात राहत असल्याची माहिती दिली. मात्र अधिक माहिती विचारण्यापूर्वी संबंधित महिलेने फोन ठेवला आणि स्वीच ऑफ करून टाकला. त्यावेळी शहरात जोरदार पाऊस असल्यामुळे अशा अवस्थेत महिलेला बाहेर न जाऊ देण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. या महिलेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी मुलगी भोर येथे राहत असल्याचे संगितले. मात्र याविषयी त्यांनाही अधिक आठवत नसल्याने त्यांनी दिलेल्या माहितीवर तपास करून पोलिसांनी त्यांच्या मुलीचा पत्ता शोधला. दुर्दैवाने तिथेही पाऊस सुरु असल्यामुळे येण्याजाण्याचा रस्ता बंद होता. अखेर खूप विचार करून पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये वास्तव्यास ठेवले. त्यांच्यासाठी कर्मचारी घरून अधिकचा डबा आणत होते. शुक्रवारी पाऊस कमी झाल्यावर पोलीस उपनिरीक्षक मंगेश साळवी,पोलीस कॉन्स्टेबल सागर नारगे, प्रज्ञा खोपडे, संध्या काकडे यांनी संबंधित महिलेला मुलगी शैला व जावई मिहान यादव यांच्याकडे खासगी वाहनाने पोहोचवले.
या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे म्हणाले की, वृद्ध महिलेला कोणी नातेवाईक नाही म्हणून शासनाच्यावतीने वृद्धाश्रमात ठेवता आले असते. परंतु ती सुद्धा आई आहे आणि आपल्या आईप्रमाणे तिला सुद्धा भावना आहेत. तिला तिच्या मायेच्या इतर माणसांपर्यंत पोहचवले पाहिजे, असा विचार करून तिच्या मुलीचा पत्ता शोधून घरी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.