पुणे पोलिसांची 'सुपर' कामगिरी! १५ लाख अन्न पाकिटे, ६२ हजार धान्य किट, ५० हजार मास्क, ४९ हजार सॅनिटायझरचे वाटप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 08:39 PM2020-05-19T20:39:27+5:302020-05-19T20:51:06+5:30
लॉकडाऊनमधील पुणे पोलिसांची कामगिरी
पुणे : १५ लाख १७ हजार ७८८ अन्न पाकिटे, ६२ हजार ५५७ धान्य किट, ५० हजार ८०७ मास्क, ४९ हजार २४७ सॅनिटायझऱ २३ मार्चपासून शहरात अडकलेल्या तसेच लॉकडाऊन सुरु झाल्याने उपजिविकेचे साधन नसलेल्या पुणे शहरातील सर्वस्तरातील लोकांना शहर पोलीस दलाच्या सोशल पोलिसिंग सेलकडून पुरविण्यात आलेल्या मदतीचे हे आकडे आहेत.लॉकडाऊनमध्ये २४ तास बंदोबस्ताबरोबर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांनी घराबाहेर पडू नये, घरातच थांबावे यासाठी मदतीचा हात शहर पोलिसांनी पुढे केला आहे.
लॉकडाऊन सुरु झाल्यापासून आतापर्यंत पुणे शहरातील बेघर, परप्रांतीय कामगार, ईशान्य भारत तसेच परराज्यातील गरजू विद्यार्थी, तृतीयपंथीय, सेक्स वर्कर,झोपडपट्टीतील रहिवासी, मजूर वर्ग, ससून हॉस्पिटल तसेच कमला नेहरु हॉस्पिटल येथील रुग्णांचे नातेवाईक अशांना शहर पोलीस दलाकडून अन्नपाकिटे पुरविली जातात. प्रतिबंधित क्षेत्रात पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले आहे. हे काम अजूनही सुरु आहे.९ ते १७ मे दरम्यान १३ रेल्वे गाड्यांच्या माध्यमातून १७ हजार ८१४ व्यक्तींना गावी रवाना केले. त्यांच्यासोबत तितकीच अन्न पाकिटे व पाणीबाटल्या पुरविण्यात आल्या. तसेच ४४९ बस गाड्यांमधून ११ हजार १४८ व्यक्तीेंना परराज्याच्या सीमेवर तसेच राज्यातील विविध जिल्ह्यात रवाना करण्यात आले. त्या सर्वांना प्रवासात खाण्यासाठी अन्न पाकिटे व पाणीबाटल्या पुरविण्यात आल्या.
सोशल पोलिसिंग सेलच्या माध्यमातून अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, डॉ. संजय शिंदे, उपायुक्त बच्चनसिंग, सहायक पोलीस आयुक्त विजय चौधरी हेमार्गदर्शन करीत आहेत. पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर, सुनिल दोरगे तसेचवाहतूक विभागातील २० कर्मचारी त्यांच्यासह प्रत्येक पोलीस ठाण्यातील तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी हे काम करीत आहेत.लॉकडाऊनच्या काळात शहर पोलीस दलावर २४ तास बंदोबस्ताचे मोठे काम येऊन पडले असतानाही प्रथमच पोलिसांकडून इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि सलग इतके दिवस मदतीचे हे सत्र सुरु ठेवण्यात आले आहे.