Pune Police: सायबर चोरट्यांकडून पुणे पोलीस लक्ष्य; पोलीस आयुक्त कुमारांच्या नावाने पैशांची मागणी
By भाग्यश्री गिलडा | Published: July 15, 2024 06:28 PM2024-07-15T18:28:10+5:302024-07-15T18:29:09+5:30
माझ्या फोटोचा गैरवापर करून नागरिकाकडून पैशाची मागणी होत आहे तरी अशा पद्धतीची कुठली रिक्वेस्टला किंवा मेसेजला रिप्लाय करू नये, अमितेश कुमार यांचे आवाहन
पुणे : सोशल मीडियाचा गैरवापर करत सायबर चोरट्यांकडून नागरिकांना वेठीस धरले जात असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, आता तर पुणे पोलीस दलाच्या पोलीस आयुक्तांचे नाव आणि फोटो वापरून सायबर चोरट्यांकडून फसवणूक करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. याबाबत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्हाट्सएप स्टेटस ठेऊन नागरिकांना संबंधित प्रतिसाद न देण्याचे आवाहन केले आहे.
पोलीस आयुक्ता अमितेश कुमार यांचा फोटो डीपीवर ठेवून लोकांकडून पैशाची मागणी होत असल्याची माहिती त्यांनी आपल्या व्हॉट्सॲपला स्टेटसद्वारे दिली आहे. "माझ्या फोटोचा गैरवापर करून नागरिकाकडून पैशाची मागणी होत आहे तरी अशा पद्धतीची कुठली रिक्वेस्टला किंवा मेसेजला रिप्लाय करू नये अशी विनंती" असे स्टेटस ठेवून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.
सायबर चोरट्यांकडून मेसेज, लिंक पाठवून पैसे हडपण्याचे प्रकार समोर आले आहेत. काही वेळा तर बँकेतून बोलतोय असे सांगूनही फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे. आयटी तरुण, ज्येष्ठ नागरिक अशा अमिषाला बळी पडत आहेत. अशातच आता सायबर चोरटयांनी थेट पुणे पोलिसांनाच लक्ष्य केले आहे. आयुक्तांच्या नावे पैसे मागण्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आता सायबर चोरट्यांकडून पोलिसही सुरक्षित नसल्याचे दिसून आले आहे. नागरिकांनी अशा वेळी कुठल्याही मेसेजला रिप्लाय देऊ नये. तसेच कोणत्याही अमिषाला बळी पडू नये असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.