गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ, साताऱ्यानंतर आता पुणे पोलिसही अटक करण्याची शक्यता...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 06:59 PM2022-04-15T18:59:07+5:302022-04-15T19:13:47+5:30
सातारा पोलिसानंतर पुढे पुणे पोलिसही गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्याची शक्यता
धनकवडी : वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा न्यायालयानं ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सातारा पोलिसानंतर पुढे पुणे पोलिसही गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्याची शक्यता आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात ९ सप्टेंबर २०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पुणे पोलीस त्यांना अटक करण्याची शक्यता आहे. पोलिसांनी यासंदर्भातील अहवाल शासनास पाठवला आहे.
भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कात्रज परिसरात राहणारे अमर रामचंद्र पवार (वय ३५ वर्षे) यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. अमर पवार हे बांधकाम व्यावसायिक असून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणून काम पाहतात. सदावर्ते यांनी ७ ऑक्टोबर २०२० रोजी एका वृत्तवाहिनीवर बोलत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ही तक्रार देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा वंशजांचा एकेरी उल्लेख करुन सकल मराठा समाजाचा अपमान होईल व जाती-पाती मधे तेढ निर्माण होऊन दंगल भडकेल अशा प्रकारचे शब्द वापरल्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर अँड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. सध्या गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे आहे. काल मुंबई पोलिसांकडून सातारा पोलिसांनी सदावर्तेंचा ताबा घेतला होता.
''आमच्याकडे गुन्हा दाखल असून शासनाकडून आदेश प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यात येईल असे भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी सांगितले.''