पुणे: ‘त्या’ पोलिसाला कोठडी, आरोपींना पळून जाण्यास केली मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 05:00 AM2017-12-20T05:00:26+5:302017-12-20T05:00:46+5:30
येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींना आर्थिक फायद्यासाठी पळून जाण्यास बेकायदेशीरपणे सहकार्य करणा-या आणि पोलिसांत खोटी तक्रार देणा-या पोलिसाला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. पी. उत्पात यांनी हा आदेश दिला.
पुणे : येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींना आर्थिक फायद्यासाठी पळून जाण्यास बेकायदेशीरपणे सहकार्य करणा-या आणि पोलिसांत खोटी तक्रार देणा-या पोलिसाला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. पी. उत्पात यांनी हा आदेश दिला.
संजय काशिनाथ चंदनशिवे (रा. दत्तनगर, आंबेगाव) असे पोलीस कोठडी झालेल्या आरोपीचे नाव असून तो पोलीस कर्मचारी आहे, तर संतोष ऊर्फ लुंब्या चिंतामणी चांदिलकर (वय ३६, रा. लवळे, मुळशी), राजू ऊर्फ काल्या महादेव पात्रे (वय ३१, रा. विद्यानगर, चिंचवड), गिड्या ऊर्फ विशाल नागू गायकवाड (वय ३१, रा. म्हेत्रेवस्ती, चिखली), मनजीत ऊर्फ आबा मानसिंग सावंत (वय २६, रा. सांगली), गणेश रघुनाथ अहिवळे (वय ३५, रा. मोरवाडी, पिंपरी), विनयकुमार रामसिंग कुर्मी (वय ३३, रा. मोरवाडी, पिंपरी), हमीद नवाब शेख (वय ३६, रा. खराळवाडी, पिंपरी), सचिन जयविलास जाधव (वय ३४, रा. खराळवाडी, पिंपरी), सुरेश स्वामीनाथ झेंडे (वय २९, रा. थेरगाव), विजय रामदास वाघमारे (वय ३८, रा. वानवडी) अशी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच यातील सुशील हरिश्चंद्र मंचरकर (वय ५०, रा. नेहरूनगर) हा जामिनावरील आरोपी आहे.
पोलीस कोठडी दिलेल्या आरोपीने न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींना येरवडा कारागृहातून सातारा न्यायालयात हजर केले. मात्र, न्यायालयातून परत आणताना त्यांना आर्थिक फायद्यासाठी पलायन करण्यास सहकार्य केले. तसेच न्यायालयीन कोठडीतील आरोपी चकवा देऊन पळून गेल्याची खोटी तक्रार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दिली.
संजय चंदनशिव याने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी तपास केला. त्यात चंदनशिव याने खोटी तक्रार दिल्याची माहिती समोर आली. तसेच जामिनावरील आरोपी सुशील मंचरकर याने राजकीय वैमनस्यातून कैलास कदम याचा काटा काढण्यासाठी गुन्ह्यातील इतर आरोपींसह येरवडा कारागृहात खुनाचा कट रचला. त्यासाठी लुंब्या, काल्या आणि संतोष जगताप यांना ३० लाख रुपयांची खुनाची सुपारी दिली. तसेच पूर्वनियोजन करून या आरोपींची खेड शिवापूर फाट्याजवळील हॉटेलमध्ये भेट घेऊन जेवण केले. त्यात आरोपी व पोलीस पार्टीतील कर्मचाºयांनी इतर कर्मचाºयांबरोबर जेवण करून मद्य प्राशन केले. त्यानंतर तिन्ही आरोपी व पोलीस पार्टीतील कर्मचारी खासगी कारमधून पिंपरी येथे आले. त्यानंतर त्यांनी पलायन केले. तसेच आरोपी मंचरकर याने पलायन केलेल्या आरोपींना कैलास कदम यांचे राहते घर व तो दर्शनासाठी जात असलेले मंदिर दाखवले. त्याचप्रमाणे आरोपींना ५ लाख रुपये पिस्टल व मोबाईल पुरवले. त्यातूनच आरोपींनी संघटीत गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्यात संजय चंदनशिव याचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले.
आरोपी चंदनशिव याने पोलीस पथकाचे प्रमुख असताना न्यायालयीन कोठडीतील आरोपींना पलायन करण्यास सहकार्य केले. बेकायदेशीरपणे स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी जाणीवपूर्वक गुन्ह्यात सहभाग घेऊन टोळीतील सक्रिय सदस्य म्हणून काम केल्याचे तपासात निष्पन्न झाले.