Pune Porsche Car Accident Breaking: पुणे पोलीस उद्या २ तास 'बाळा'ची चौकशी करणार; बाल न्याय मंडळाने दिली परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 07:50 PM2024-05-31T19:50:11+5:302024-05-31T19:51:32+5:30
बाळाचे पालक उपलब्ध नसल्याने बाल हक्क न्याय मंडळाच्या सदस्याच्या उपस्थितीत ही चौकशी होणार
Pune Porsche Car Accident : विशाल अग्रवाल यांच्या मुलाने भरधाव वेगाने आलिशान पोर्शे कार चालवत दुचाकीला धडक दिल्याने दोघांना विनाकारण जीव गमवावा लागलाय. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यावर 300 शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगितले होते. यानंतर जोरदार टीका झाल्याने, पोलिसांनी बाल न्याय मंडळात पुनर्विचार याचिका दाखल केली, त्यानंतर बोर्डाने आदेशात बदल करून अल्पवयीन आरोपीला ४ जूनपर्यंत बालसुधारगृहात पाठवले. बाळाने दारू पिऊन गाडी चालवल्यचा दावा पोलिसांनी केला. जेजे बोर्डाला एक पत्र लिहून अल्पवयीन आरोपीविरुद्ध चौकशी करण्याची परवानगी मागितल्याचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी सांगितले होते.
बाल न्याय मंडळाकडून अल्पवयीन आरोपीची चौकशी करण्याची पुणे पोलिसांना परवानगी मिळाली आहे. पुणे पोलीस उद्या २ तास बाळाची चौकशी करणार आहेत. त्याचे पालक उपलब्ध नसल्याने बाल हक्क न्याय मंडळाच्या सदस्याच्या उपस्थितीत ही चौकशी होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान विशाल अग्रवाल यांच्या मुलाने भरधाव वेगाने आलिशान पोर्शे कार चालवत दुचाकीला धडक दिली. यावेळी त्या गाडीचा वेग इतका होता कि डोळ्याची पापणी मिटेपर्यंत पोर्शे कार समोरून पास झाली. दुचाकीला धडक दिल्यानंतर तरुणी अक्षरशः १० फूट उंच उडून खाली पडली. तर तरुण लांब फेकला गेला. क्षणार्धातच दोघांचा जीव गेला. हि घटना पाहून प्रत्यक्षदर्शींचाही थरकाप उडाला होता.
बाप - लेकाला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी
बाळाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल याला २८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. बाळाला ४ जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्यात आले. तर विशाल अग्रवालला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. ससूनच्या धक्कादायक प्रकरणानंतर अनेक मासे गळाला लागण्यास सुरुवात झाली आहे. दोघा बाप-बेट्यांनी त्यांच्या चालकाला डांबून ठेवून धमकी दिल्याने अग्रवाल यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. हे तपासण्यासाठी दोघांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. त्यांना न्यायालयाने ३ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. ती आज संपल्याने पुन्हा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
ससूनचे डॉक्टर निलंबित
अपघात प्रकरणात ३ लाखाची लाच स्वीकारून बाळाचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी आणि रक्ताचा बनावट अहवाल तयार केल्याप्रकरणी ससूनमधील फॉरेन्सिक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर आणि शवविच्छेदन विभागातील शिपाई अतुल घटकांबळे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. या तिघांना ससून रुग्णालयातून निलंबित करण्यात आले आहे.