"एल्गार परिषद प्रकरणात पुणे पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर, त्यांची चौकशी करणार''
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 12:47 PM2019-12-21T12:47:12+5:302019-12-21T12:47:34+5:30
एल्गार परिषद प्रकरणात पुणे पोलिसांचे वागणे आक्षेपार्ह होतं. त्यांच्याकडून अधिकारांचा गैरवापर करण्यात आला.
पुणेः एल्गार परिषद प्रकरणात पुणे पोलिसांचे वागणे आक्षेपार्ह होतं. त्यांच्याकडून अधिकारांचा गैरवापर करण्यात आला. मूलभूत स्वातंत्र्यावर गदा आणून काहींना आत टाकण्यात आलं. पुणे पोलिसांच्या कारवाईची चौकशी करावी, अशी मागणी महाविकास आघाडी सरकारकडे शरद पवारांनी केली आहे. ते पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
नक्षलवादाचं पुस्तक एकाच्या घरात सापडलं, म्हणजे तो गुन्हा नव्हे, माझ्याही घरात नक्षलवादाचं पुस्तक आहे, आम्हीही माहिती घेतो म्हणजे लगेच गुन्हा ठरत नाही, असंही पवार म्हणाले आहेत. लोकशाहीत तीव्र भावना मांडल्या जातात, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातही तसे झाले होते. मात्र त्यासाठी कोणी राष्ट्रद्रोहाचा खटला टाकला नव्हता. हा समाजाचा बुद्धिमान वर्ग म्हणून ओळखला जातो, असंही पवारांनी अधोरेखित केलं आहे.
सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक यांना तुरुंगात डांबून ठेवले आहे. नामदेव ढसाळ यांचा गोलपीठा सगळ्यांनी वाचला आहे, त्यात त्यांनी असंतोष मांडला आहे, असंही पवार म्हणाले आहेत. शदर पवारांनी ढसाळ यांच्या 'रक्ताने पेटलेल्या अगणित सूर्यांनो ' कवितेचे वाचन केले. सुधीर ढवळे यांनी वाचलेल्या दोन ओळींसाठी त्यांना तुरुंगात ठेवले हा सत्तेचा गैरवापर आहे. त्यांनी वाचलेल्या जर्मन कवितेचे हिंदीतून वाचनही पवार यांनी केले. टीका केली म्हणून राष्ट्रद्रोह म्हणणे योग्य नाही. यावेळी त्यांनी संशयित आरोपी असलेल्या व्यक्तींची नावे आणि शिक्षण, हुद्दे वाचून दाखवले.