महिलांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलिसांचे ‘बडी कॉप’

By Admin | Published: March 8, 2017 05:17 AM2017-03-08T05:17:55+5:302017-03-08T05:17:55+5:30

रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या नोकरदार महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अभिनव उपक्रम हाती घेतला असून, संगणक अभियंता अंतरा दास

Pune police's 'big cop' for women's safety | महिलांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलिसांचे ‘बडी कॉप’

महिलांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलिसांचे ‘बडी कॉप’

googlenewsNext

पुणे : रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या नोकरदार महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अभिनव उपक्रम हाती घेतला असून, संगणक अभियंता अंतरा दास आणि रसिला राजू यांच्यासारख्यांच्या हत्या घडू नयेत याकरिता ‘बडी कॉप’ (मित्र पोलीस) ही सेवा सुरू करण्यात आली आहे. चार पोलीस ठाण्यांमध्ये सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमासाठी ८० पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ज्या महिलेला रात्री उशिरा कामावरून घरी जात असताना असुरक्षित वाटेल तिला हा ‘बडी कॉप’ मदत करणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिली.
पुणे पोलिसांच्या या उपक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सह आयुक्त सुनील रामानंद, सायबर गुन्हे शाखेचे उपायुक्त दीपक साकोरे, सहायक आयुक्त सुरेश भोसले, अरुण वालतुरे, निरीक्षक राधिका फडके यांच्यासह संगणकतज्ज्ञ पंकज घोडे उपस्थित होते. हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीमध्ये रसिला राजू हिचा खून झाला होता. आयटी क्षेत्रातील महिलांंना रात्री-अपरात्री कामावर जावे लागते. त्यांच्या सुरक्षेसंदर्भात विचार करीत असताना नागरिकांकडून सूचना मागवल्या होत्या. वॉल्क विथ सीपी हा उपक्रम हिंजवडीमध्ये राबवण्यात आला. त्या वेळी बडी कॉपची संकल्पना समोर आली. नेहरू मेमोरियल हॉलमध्येही सुरक्षेसंदर्भात चर्चासत्र घेण्यात आले. आयटीतील तसेच सर्वच नोकरदार महिलांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू असल्याचे आयुक्त शुक्ला यांनी सांगितले.
वाकड, खराडी आणि हिंजवडीसह ज्या भागात आयटी कंपन्या आहेत, त्या कंपन्यांकडून एक हजारापेक्षा अधिक कर्मचारी महिलांची यादी पोलिसांना मिळाली आहे. पोलीस आता त्यांना ईमेल तसेच मोबाईलवरून संपर्क साधून त्यांचे व्हॉट्सअ‍ॅपवर ग्रुप बनवणार आहेत. ४० महिलांमागे एक पोलीस (बडी कॉप) नेमण्यात आलेला आहे. या पोलीस कर्मचाऱ्याचा मोबाईल क्रमांक सर्व महिलांना देण्यात येणार असून, रात्री घरी जाताना असुरक्षित वाटले तर त्या महिलेने संबंधित बडी कॉपला संपर्क साधावा. त्यांना आवश्यक ती सर्व मदत त्यांच्याकडून केली जाईल. प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये यासंदर्भात माहिती देणारे फलक लावण्यात येणार आहेत. यापूर्वीही पोलिसांनी संकेतस्थळावरील माय कम्प्लेंट या आॅप्शनमधून तक्रार करण्याचे आवाहन केलेले आहे. महिला हेल्पलाईनद्वारेही तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. हिंजवडीत झालेल्या खुनाच्या घटनेनंतर याभागात दामिनी पथकाची आणखी तीन नवी पथके नेमण्यात आली आहेत.

प्रतिसाद अ‍ॅपच्या धर्तीवर पुणे पोलिसांनी ‘आॅफलाईन’ चालणारे लोकेशन बेस्ड एसओएस मोबाईल अ‍ॅप्लिकेशन सुरू केले आहे. महिलांना हे अ‍ॅप मोबाईलवर डाऊनलोड करावे लागेल. त्या ज्या ठिकाणी असतील तेथून अडचणीच्या काळात अ‍ॅपवर क्लिक केल्यास तत्काळ त्यांचे नेमके ठिकाण पोलिसांना समजेल.

संबंधित महिला ज्या भागात असेल त्या भागातील पोलीस ठाण्यांचे क्रमांक आपोआप स्क्रिनवर येतील. यातील क्रमांक डायल केल्यावर सुरुवातीला पोलीस ठाण्यात फोन जाईल. तेथे कोणी फोन उचलला नाही तर हा कॉल पोलीस निरीक्षकाच्या मोबाईलवर जाईल. त्यांनीही जर फोन उचलला नाही तर सहायक आयुक्त आणि त्यानंतर उपायुक्तांना कॉल जाणार आहे.

या अ‍ॅपसाठी सेल्युलर ट्रँग्युलर सिस्टीम वापरण्यात आल्याने जीपीएस अथवा इंटरनेटशिवाय हे अ‍ॅप काम करू शकणार असल्याचे अ‍ॅप बनवणारे पंकज घोडे यांनी सांगितले. प्रतिसाद अ‍ॅपचे हे अपग्रेडेड व्हर्जन आहे.

नोकरदार महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस कायम कटिबद्ध आहेत. समाजातील सर्वच महिलांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. महिलांनीही अन्याय सहन करू नये. तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून आपली तक्रार द्यावी. आवश्यक असल्यास मदत मागावी. पोलिसांकडून नक्कीच सहकार्य मिळेल. सुरक्षेसाठी बडी कॉप आणि लोकेशन बेस्ड एसओएस मोबाईल अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे. - रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त, पुणे

Web Title: Pune police's 'big cop' for women's safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.