Pune: रविवारी पोलिओ लसीकरण, पुणे शहर व जिल्ह्यात हाेणार लसीकरण
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: March 2, 2024 06:56 PM2024-03-02T18:56:08+5:302024-03-02T18:56:40+5:30
या माेहिमेद्वारे आपल्या बालकांचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन आराेग्य यंत्रणेद्वारे करण्यात आले आहे....
पुणे :पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आज (रविवारी) ० ते ५ वयोगटातील बालकांसाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. या माेहिमेअंतर्गत पुणे शहर आणि जिल्ह्यातील सुमारे ८ लाख बालकांना ताेंडावाटे दाेन थेंब देऊन त्यांचे पाेलिओ लसीकरण करण्यात येणार आहे. या माेहिमेद्वारे आपल्या बालकांचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन आराेग्य यंत्रणेद्वारे करण्यात आले आहे.
भारत पाेलिओमुक्त आहे; परंतु काही देशांमध्ये अजूनही पाेलिओ असल्याने ताे पुन्हा आपल्याकडे येऊ शकताे म्हणून पाेलिओचे डाेस देण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आलेले आहे. याअंतर्गत पुणे शहरात १३६२ पाेलिओ बूथद्वारे २ लाख ८८ हजार ७८४ बालकांना डाेस देण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी १५ हेड सुपरवायझर, २१२ पर्यवेक्षक आणि १९९१ पथके कार्यरत असणार आहेत, अशी माहिती महापालिकेचे आराेग्य अधिकारी डाॅ. भगवान पवार यांनी दिली.
शहरात येथे हाेणार लसीकरण
शहरात ही माेहीम ५४ दवाखाने, १९ प्रसूतिगृहे व २९ नवीन एचसीडब्ल्यूअंतर्गत बूथद्वारे तसेच वीटभट्ट्या, स्थलांतरित वस्त्या, बांधकाम सुरू असलेली ठिकाणे, अतिजाेखमीचे भाग या ठिकाणी देखील बूथ लावण्यात येणार आहेत. बसस्थानके, एसटी स्थानके, मेट्राे स्टेशन, रेल्वेस्टेशन, एअरपाेर्ट, उद्याने या ठिकाणी ट्रान्झिट टीम नेमण्यात येणार आहे. या माेहिमेतून सुटलेल्या बालकांसाठी ४ ते ९ मार्चदरम्यान आयपीपीआय माेहिमेअंतर्गत १० लाख ३५ हजार घरांना भेटी देत लस दिली का? याची खात्री केली जाणार आहे.
जिल्ह्यातही सूचना
जिल्ह्यातही या मोहिमेमध्ये ० ते ५ वर्षे वयोगटातील ग्रामीण भागातील ४ लाख ९८ हजार ७९८ बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्टे आहे. ही मोहीम १०० टक्के यशस्वी करण्यात यावी, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी दिल्या आहेत. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक गाव व पाड्यावर आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यासह ४०५ आरोग्य पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर वंचित राहिलेल्या बालकांना ग्रहभेटीदरम्यान ग्रामीण भागात ५ ते ७ मार्च (३ दिवस) डाेस देण्यात येणार आहेत.