कुल-थोरात सामने येणार...?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 01:10 AM2018-11-05T01:10:26+5:302018-11-05T01:11:09+5:30
दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल व माजी आमदार रमेश थोरात यांच्यात विकासकामांसाठी आणलेल्या निधीवरून कलगीतुरा रंगला आहे.
यवत - दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल व माजी आमदार रमेश थोरात यांच्यात विकासकामांसाठी आणलेल्या निधीवरून कलगीतुरा रंगला आहे. दोघांनी समोरासमोर चर्चा करण्याचे आव्हान-प्रतिआव्हान दिले होते; मात्र ते साधणार कसे, अशी चर्चा होती. मात्र दोघांचेही निकटवर्तीय असलेले वसंत साळुंखे यांनी त्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, आता तरी दोघे एकाच व्यासपीठावर येणार का, अशी विचारणा होत आहे.
आमदार कुल व माजी आमदार थोरात यांचे निकटवर्तीय वसंत साळुंखे यांनी दोघांना पत्र लिहून समोरासमोर चर्चेसाठी आणण्याबाबत प्रयत्न केले आहेत. दोघांनी साळुंखे यांच्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद दिल्यास विकास निधी नक्की कोणामुळे आला, हे पुढे येऊ शकते. आमदार कुल यांनी माजी आमदार थोरात यांच्यापेक्षा चारपट जास्त निधी तालुक्याच्या विकासकामांसाठी आणल्याचे सांगितले होते. यावर थोरात यांनी कुल खोटे बोलत असल्याचे सांगून त्यांचे समोरासमोर चर्चेचे आव्हान दिले होते. दोन्ही नेते जाहीर भाषणातून एकमेकांवर जोरदार टीका करताना निधी आणण्याच्या प्रश्नावर आपणच कसे पुढे होतो, याचे दाखले देत आहेत. याचबरोबर समोरासमोर चर्चेची तयारी असल्याचे सांगत होते. मात्र कधी समोरासमोर चर्चा होणार, यावर दोन्ही गटात चुप्पी होती. यामुळे कुल व थोरात दोन्ही नेते तालुक्यातील जनतेला मूर्ख बनवीत असून त्यांच्यातील टीकाटिप्पणी म्हणजे केवळ नुरा कुस्ती असल्याचे तालुक्यातील भाजपाचे नेते वासुदेव काळे यांनी सांगितले होते.
त्या पार्श्वभूमीवर पाटस येथील वसंत साळुंखे यांनी दोघांनाही पत्र दिले असून एकत्र चर्चेसाठी तारखा कळवण्याचे आवाहन केले आहे.
अद्यापही प्रतिसाद नाही...
सदर पत्र दोन्ही नेत्यांना दिल्यानंतर दहा दिवस झाल्यानंतर आमदार कुल यांनी त्यांच्या वाढदिवशी त्यांच्या आणलेल्या निधी व कामांचा सविस्तर अहवाल प्रकाशित केला आहे. मात्र साळुंखे यांच्या पत्राला अजूनपर्यंत प्रतिसाद दिला नसल्याचे साळुंखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.