पुणे : व्याधीग्रस्त गरीब ज्येष्ठांनाही मिळतोय वैद्यकीय सेवेचा आधार! आतापर्यंत ४५०० जणांना लाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 12:50 PM2020-10-20T12:50:50+5:302020-10-20T12:56:29+5:30
संसर्गजन्य आजारात सर्वाधिक बळी हे वृध्द व अन्य आजार जडलेल्या व्यक्तींचे जातात हे कोरोना आपत्तीने अधोरेखित केले आहे.
निलेश राऊत-
पुणे : शहरातील झोपडपट्टी भागात उपचारावाचून दुर्लक्षित राहिलेल्या ज्येष्ठ व गरीब व्यक्तींना शोधून, त्यांना रक्तदाब, मधूमेह सारख्या व्याधींवर औषधे देण्याबरोबरच त्यांना मानसिक आधार देण्याचे काम शहरातील स्वयंसेवी संस्थांकडून होत आहे. या कामाला आता महापालिकेच्या आरोग्य विभागानेही साथ दिली असून, या ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष ओपीडी (प्राथमिक आरोग्य तपासणी केंद्र) उभारण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
सोसायटी ऑफ कम्युनिटी हेल्थ ओरियंटेड ऑपरेशन (स्कूल) व पुणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने मे २०२० पासून शहरातील झोपडपट्टी भागात व्याधीग्रस्त गरीब ज्येष्ठांसाठी हा उपक्रम राबविला जात आहे. आजपर्यंत शहरातील १२ वस्त्यांमधील साडेचार हजार ज्येष्ठ नागरिकांना याव्दारे नियमित औषधोपचार देण्याचा प्रयत्न केला गेला असून, या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्याकरिता पालिकास्तरावर आणखी भरीव सहभागाची आवश्यकता आहे. यामुळेच महापालिकेनेही केंद्राच्या ‘राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान’(एनयुएचएम) अंतर्गत याची आखणी करून, त्याकरिता स्वतंत्र आर्थिक तरतूदीसाठी प्रस्ताव दाखल करण्यास प्रारंभ केला आहे.
संसर्गजन्य आजारात सर्वाधिक बळी हे वृध्द व अन्य आजार जडलेल्या व्यक्तींचे जातात हे कोरोना आपत्तीने अधोरेखित केले आहे. यामुळे सर्वच शासकीय यंत्रणांनी सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून अशा व्यक्तींना शोधून त्यांना वेळीच उपचार देण्याची कार्यवाहीही सुरू केली. परंतु, काही स्वयंसेवी संस्थाही हेच काम पूर्वीपासून करीत आहेत. ‘स्कूल’या संस्थेव्दारे शहरातील २५ झोपडपट्ट्यांमधील ४ हजार ८०० गरीब ज्येष्ठ नागरिकांची आत्तापर्यंत तपासणी करण्यात आली असून, यासर्वांना अन्य दानशूर संस्था व व्यक्तींच्या माध्यमातून व्हिल चेअर, आधारकाठी, चष्मे तथा अन्य वैद्यकीय सहाय्यक वस्तू तसेच नियमित मल्टि विटॅमिनच्या गोळ्या दिल्या जात आहेत. याला महापालिकेनेही मदत केली असून, बीपी शुगर असलेल्या या ज्येष्ठांना स्कूलच्या माध्यमातून नियमित औषधे पुरविण्यास नुकतीच सुरूवात केली आहे.
---------------------
साडेचार हजाराहून अधिक ज्येष्ठांच्या नोंदी व औषधोपचार
स्कूल संस्थेच्या माध्यमातून शहरातील १२ वस्त्यांमधील साडेचार हजार गरीब ज्येष्ठ नागरिकांच्या तपासणी करून त्यांच्या आजाराच्या नोंदी ठेवण्यात आल्या आहेत़ यात सुमारे ६५७ उच्च रक्तदाब, ६४६ मधुमेह, ५१ फ्र क्चर, ७४ अर्धांगवायू, गुडघेदुखीचे ९३८, मोतिबिंदू असणारे ९५५ असे रूग्ण आहेत. तर मानसिक आधार नसल्याने खचलेले ही शेकडो ज्येष्ठ औषोधोपचाराच्या व आधाराच्या प्रतिक्षेत आहेत.
या सर्वांना औधोपचाराबरोबरच मानसिक आधार देणे, फिजिओ थेरपीसाठी यंत्रणा उपलब्ध करून देण्याची सध्या गरज आहे.
---------------------
अभियानाची आवश्यकता
कोरोना आपत्तीत पुण्यात जेवढे मृत्यू झाले त्यात अन्य व्याधीग्रस्त व्यक्ती तथा वय वर्षे ६० वरील व्यक्तींचे मृत्यूचे प्रमाण हे ८५ टक्क्यांपर्यंत आहे़ अनेक ज्येष्ठ नागरिक हालाखीच्या परिस्थितीमुळे बी़पी़शुगरसारख्या आजारांकडे दुर्लक्ष करतात़ परिणामी यांनाच या संसर्गजन्य आजारात सार्वधिक धोका उद्भवतो. त्यामुळे शहरातील दुर्लक्षित राहिलेल्या या वर्गाकडे वेळीच लक्ष दिले व त्यांना नियमित औषोधोपचार देण्याची यंत्रणा उभारली तर मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. याकरिता वय वर्षे ६० वरील गरीब ज्येष्ठांकरिता स्वतंत्र ओपीडीची मागणी होत असून, त्यास महापालिकेनेही होकार दिला.
-------------------
स्कूल व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील गरीब वृध्दांसाठी राबविण्यात येणारा हा देशातील एकमेव प्रकल्प आहे. तत्कालीन महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी यात पुढाकार घेऊन, वृध्दांसाठी विशेष विकली ओपीडी सुरू करणे, स्पेशल जेरियाट्रिक युनिट सुरू करणे व फिजियो थेरपी युनिट सुरू करण्याबाबत सांगितले आहे़ या सर्व सुविधा ‘राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान’(एनयुएचएम) अंतर्र्गत सुरू करण्यासाठी पालिकेने कार्यवाही सुरू असून, लवकरच ज्येष्ठांसाठी स्वतंत्र ओपीडी सुरू होतील.
डॉ. कल्पना बळीवंत, सहाय्यक आरोग्य अधिकारी पुणे महापालिका.
----------------------
स्कूल संस्थेच्या माध्यमातून शहरातील या सर्वांना औषधोपचाराबरोबरच मानसिक आधार देणे, फिजिओ थेरपीसाठी यंत्रणा उपलब्ध करून देण्याची सध्या गरजधोपचार न मिळणाऱ्या गरीब ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करून त्यांची नोंद ठेवण्यात येत असून, त्यांना नियमित औषधे देण्यात येत आहेत. कोरोनासारखे संसर्गजन्य आजार येतील व जातील, परंतु या काळात अन्य व्याधीग्रस्त ज्येष्ठांना वेळेत औषधोपचार मिळत असेल, तर मृत्यूदर आटोक्यात येऊ शकेल. यासाठी अशा गरीब जेष्ठांना मोफत ओपीडी सुरू करण्याबाबत पालिकेकडे मागणी केली असता त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
डॉ. बेनझीर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्कूल़