पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 06:36 AM2024-05-25T06:36:58+5:302024-05-25T06:37:30+5:30
पोलिस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलिस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी अशी निलंबित करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. अपघात झाला त्या रात्री हे दोघे त्या ठिकाणी ड्यूटीवर तैनात होते.
पुणे : पोर्शे कार अपघातप्रकरणी तपासात दिरंगाई केल्याच्या ठपका ठेवत येरवडा पोलिस ठाण्यातील दोन पोलिस निरीक्षकांचे निलंबन करण्यात आले आहे. ड्रंक-ड्राईव्ह प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी एक अंतर्गत कमिटी गठित केली होती. समितीच्या अहवालानंतर हा निर्णय घेण्यात आला.
पोलिस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलिस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी अशी निलंबित करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. अपघात झाला त्या रात्री हे दोघे त्या ठिकाणी ड्यूटीवर तैनात होते. अपघात झाल्यानंतर त्यांनी कंट्रोल रूमशी संपर्क केला नाही, तसेच नाईट राऊंडवर असलेल्या पोलिस उपायुक्तांनाही याची माहिती दिली नाही. त्यांनी ही माहिती का लपवून ठेवली, त्यांचा हेतू नेमका काय होता, याचीही चौकशी करण्यात येणार आहे.
होय, निष्काळजीपणा झाला : पो. आयुक्त
येरवडा पोलिसांकडून निष्काळजीपणा झाल्याची कबुली पोलिस आयुक्त अमितेषकुमार यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे एसीपी तांबे यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
विशाल अग्रवाल न्यायालयीन कोठडीत : अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.